मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे.  औरंगाबादमध्ये राज ठाकरेंनी केलेल्या एकूण भाषणातील शेवटच्या साडेचार मिनिटाच्या भाषणामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.


राज ठाकरेंना मुंबईसह आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना दिली आहे. शिवाजी पार्क पोलीस स्थानकाकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. शिवाजी पार्क पोलिस स्थानकातील काही अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहचले. राज ठाकरे यांच्या स्टाफने ही नोटीस स्वीकारली आहे. 


दरम्यान मनसेच्या उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात  15 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी 13 हजार जणांना कलम 149  अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. त्यात मनसे आणि भाजप नेत्यांचा समावेश आहे. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस दल पूर्ण क्षमतेनं सज्ज ठेवण्यात आलं आहे. त्यासाठी राज्यभरातल्या पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.


 राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांसंदर्भातली आपली भूमिका पुन्हा स्पष्ट करण्यासाठी काढलेल्या पत्रकाच्या बातमीनं. राज ठाकरे यांनी हे पत्रक काढून महाराष्ट्र सैनिकांना आणि सजग नागरिकांनाही मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात आंदोलन तीव्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिथं अनधिकृत भोंगे तिथं हनुमान चालिसा लावा. जेणेकरून त्यांनाही कळू दे की, त्रास काय असतोे असं राज यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. तसंच भोंग्यांवर बांग ऐकू येताच 100 क्रमांकावर फोन करुन पोलिसांना तक्रारी द्या असंही आवाहन त्यांनी सजग नागरिकांना केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व भोंगे उतरवलेच पाहिजेत असं सांगितलं होतं. मग तुम्ही बाळासाहेबांचं ऐकणार की पवारांचं, असा खोचक सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करा असंही राज यांनी मनसैनिकांना सांगितल्याचं कळतंय. मशिदींच्या अनधिकृत भोंग्यांवरुन अजान होत असेल तर त्या मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना याआधीच दिले आहेत. दरम्यान, याबाबत मुंबई पोलिसांकडून राज ठाकरेंना नोटीस  देण्यात आली आहे. राज ठाकरे यांना कलम 149 अंतर्गत ही नोटीस बजावली आहे.