Maharashtra Mumbai News : मुंबईत चेंबूरमध्ये भाजपच्या पोलखोल रथाची तोडफोड (Mumbai BJP Pol Khol) केल्याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. चेंबूर पोलीस ठाण्याची दोन पथकं आरोपींचा माग काढत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं असलं तरी अजूनही कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज भाजपच्या वतीनं आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपच्या वतीनं केल्या जाणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चेंबूर पोलिसांकडून पोलीस स्थानकाला बॅरिकेटिंग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राज्य राखीव दलाच्या पोलिसांच्या 2-3 गाड्या चेंबूर पोलीस स्थानकाजवळ दाखल झाल्या आहेत.  


भाजपचा आक्रमक पवित्रा, आंदोलनाची हाक 


भाजपनं आयोजित केलेल्या पोलखोल यात्रेतील रथाची तोडफोड केल्याप्रकरणी हल्लेखोरांवर अद्याप कारवाई झाली नसल्यानं, भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. हल्लेखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी करत भाजपचे नेते आज चेंबूर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार आहेत. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप आज आंदोलन करणार आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भाजपनं पोलखोल अभियानाला सुरुवात केली. या अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या रथाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड शिवसेनेनं केल्याचा संशय भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हल्लेखोरांना अटक करण्यासाठी भाजपनं चेंबूर पोलिसांना 19 तारखेच्या संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. मात्र दोन दिवस उलटूनही कुणालाच अटक न झाल्यानं भाजप नेत्यांनी आज मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. पोलखोल रथयात्रेच्या तोडफोडप्रकरणी चेंबूर पोलिसांच्या दोन टीम आरोपींच्या शोधात आहेत. पोलिसांकडून काही जणांना ताब्यात घेतलं असलं तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


काय आहे प्रकरण? 


गेल्या काही दिवसांत मुंबईत शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी भाजपनं पोलखोल यात्रा आयोजित केली. त्याचा रथ चेंबूरमध्ये फोडण्यात आला. कांदिवलीत होणाऱ्या सभेची तोडफोडही करण्यात आली होती. त्यानंतर दहिसरमध्ये शिवसेनेनं पोलखोल सभेला आक्षेप घेत स्टेज हटवायला लावला. भाजपनं दहिसरमध्ये पोलखोल सभेची तयारी सुरु केली असताना त्या भागातल्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी काल भाजप कार्यकर्त्यांना व्यासपीठ काढायला लावलं. सभेसाठी अनधिकृतपणे व्यासपीठ कसं उभारता असा सवाल करत म्हात्रे यांनी आक्षेप घेतला. त्यावरून शिवसेना-भाजप पुन्हा आमनेसामने आले आहेत.