विधान परिषदेच्या 10 जागांसाठी चुरस, निवडणूक वेळापत्रक जाहीर
एबीपी माझा वेब टीम | 13 May 2016 02:11 AM (IST)
मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालं असून, येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी विधान परिषदेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यातील 10 विधानपरिषदेच्या जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगानं गुरुवारी या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या 10 जागांसाठी 31 मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत, तर 10 जूनला या जागांसाठी मतदान होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार रामराजे निंबाळकर, धनंजय मुंडे आणि प्रकाश बिनसाळे तर काँग्रेसच्या दिप्ती चौधरी आणि मुझफ्फर हुसैन, भाजपच्या शोभाताई फडणवीस आणि विनायक मेटे तर शिवसेनेचे सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांचा कार्यकाळ येत्या 7 जुलैला संपणार आहे.