मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार का? असा प्रश्न आता प्रत्येकजण विचारत आहे. या संदर्भात आता महत्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी 29 जुलै) महत्वाची बैठक झाली. यात राज्यातील 25 जिल्ह्यांमधील लॉकडाऊन शिथिल करण्याविषयी चर्चा झाली आहे. निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.


राज्यात लागू असलेल्या निर्बंधामध्ये काही शिथिलता आणली पाहिजे यासाठी आम्ही अहवाल सादर केला आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, राज्याचे अर्थचक्र चाललं पाहिजे यासाठी शिथिलता गरजेची आहे. काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी आहे. 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरु करता येतील पण एसीचा वापर नसावा. दुसरीकडे रेस्टॉरंट, सलून पार्लर हळूहळू जास्त संख्येने सुरु करता येतील. शनिवार आणि रविवारपैकी आता शनिवारी संध्याकाळी सर्व व्यवहार सुरु ठेवता येऊ शकेल.


लोकल रेल्वे सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील : आरोग्यमंत्री
दोन डोस झालेल्यांना रेल्वेनं प्रवास करता येऊ शकतं का याची चाचपणी सुरु आहे, पण तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री रेल्वे विभागाशी चर्चा करुन निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. रेल्वे संदर्भात पुढील दोनतीन दिवसात निर्णय होईल, असेही टोपे म्हणाले.


राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 11 जिल्हे नेट सरासरी पेक्षा अधिक असल्याने तेथील कोणतेही निर्बंध शिथिल केले जाणार नाही. मात्र, इतर जिल्ह्यात जे निर्बंध लेव्हल 3 चे आहेत. त्यांच्यासंदर्भात आरोग्य विभागामार्फत सूचना मुख्यमंत्र्याना केल्या आहेत. जगात अनेक देशात तिसरी लाट सुरु आहे. लसीकरण झालं असल्यानं मृत्यूदर कमी आहे. लसीकरण वेगाने होत आहे. अर्थचक्रही चाललं पाहिजे त्यामुळे निर्बंध शिथील होतील. राज्य तिसऱ्या लाटेसाठी तयार आहे. तिसरी लाट येऊ नये असं वाटतंय, पण आलीच तर सरकारने मुबलक तयारी करुन ठेवली आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.