पुणे: अवघ्या 22 वर्षांचा पैलवान अभिजीत कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. भूगावच्या कुस्ती आखाड्यात मॅटवर अभिजीतने सातारच्या मोही गावच्या किरण भगतला धूळ चारत, महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. अभिजीतने किरणवर 10-7 अशी मात केली.


महत्त्वाचं म्हणजे अभिजीत आणि किरण हे सख्खे दोस्त आहेत. मात्र महाराष्ट्र केसरी या मानाच्या किताबासाठी या दोघांची ‘दोस्तीत कुस्ती’ होती.

या विजयानंतर अभिजीतने एबीपी माझाशी खास गप्पा मारल्या.

महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर अभिजीतच्या वडिलांनी लाडक्या लेकाला लॅण्ड क्रूझर गाडी देण्याचं आश्वासन दिलं.

मात्र यावेळी अभिजीतने वडिलांनी लावलेल्या कडक शिस्तीबद्दल सांगितलं.

सकाळी सहा वाजल्यापासून माझ्यावर पप्पांचं लक्ष असतं, पप्पांमुळे मी घडलो, असं अभिजीत म्हणाला.

याशिवाय शिवराजदादा तालीम आणि अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाड या वस्तादांनी माझ्यावर मेहनत घेतल्याचं अभिजीतने सांगितलं.



कुस्तीत दोस्ती नाही

अभिजीत आणि किरण हे सख्खे दोस्त आहेत. सोनीपतच्या राष्ट्रीय शिबिरात ही दोस्ती जमली. एकच वय आणि आवडनिवडही कुस्तीचीच. त्यामुळं त्यांच्यातली दोस्ती आणि कुस्तीही बहरली.

पण महाराष्ट्र केसरीच्या निमित्ताने हे सख्खे दोस्त एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले.

याबाबत विचारलं असता, अभिजीत म्हणाला, “दोस्ती तुटायची नाही. पण कुस्तीत दोस्ती नसती. मॅटवर दोस्ती नाही, बाहेर दोस्ती. रिंगणात सख्ख्या भावाशी पण दोस्ती नाही”.

व्हिडीओ बघून त्यांना हरवलं

विरोधी पैलवानांबाबतची रणनीती कशी आखली याबाबत अभिजीतने सांगितलं. तो म्हणाला, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदा कोण कोण खेळू शकतं, याचे व्हिडिओ मी गेली वर्षभर बघितले. त्यावरुन त्यांच्यावर मी तोड काढली आणि आज मी विजयी झालो.

ऑलिम्पिक पदक

महाराष्ट्र केसरी तर आता झाली, आता माझं लक्ष्य हिंदकेसरी, कॉमनवेल्थ गेम आणि त्यापुढे टोकिओ ऑलिम्पिक पदकावर आहे, असं अभिजीत म्हणाले.

वडिल प्रशिक्षणासाठी जॉर्जियाला पाठवण्यास तयार आहेत. तिकडे जाण्याचा फायदा म्हणजे टेक्निक सुधारेल, असा त्याला विश्वास आहे.

VIDEO:



संबंधित बातम्या

महाराष्ट्र केसरीसाठी दोस्तीत कुस्ती, सख्खे मित्र फायनलमध्ये भिडणार

पुण्याचा पैलवान अभिजीत कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी!