मुंबई : लोकलच्या हार्बर रेल्वे मार्गावर आज (25 डिसेंबर) 13 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी ते नेरुळपर्यंतच गाड्या धावतील. नेरुळपासून पनवेलपर्यंत गाड्या उपलब्ध नसल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
हार्बर मार्गावर आज 13 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून 100 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून 104 विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
25 डिसेंबरचा मेगाब्लॉक दुपारी तीन वाजेपर्यंत असेल आणि त्यानंतर लोकल सेवा पूर्ववत केली जाणार आहे. ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेकडून नवी मुंबई महापालिकेकडे अतिरिक्त बस सोडण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
हार्बरवर जम्बो मेगाब्लॉक
सीवूड ते उरण रेल्वे मार्गासाठी फलाट, रुळ यासह इतर तांत्रिक कामं बेलापूर स्थानकात घेण्यात येणार आहेत. ब्लॉक घेऊन ही कामे करण्याशिवाय मध्य रेल्वेसमोर पर्याय नाही. त्यामुळे 22 डिसेंबरपासून चार दिवसांचा ब्लॉक घेऊन कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
22 आणि 23 डिसेंबर रोजी 33 फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्याऐवजी 34 विशेष फेऱ्या चालवण्यात होत्या. तर रविवारी 12 लोकल फेऱ्या रद्द करुन, त्याबदल्यात 24 फेऱ्या चालवण्यात आल्या.