मुंबई: मुख्यमंत्री घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल. मुख्यमंत्र्यांनी अद्याप मला स्पष्टीकरण मागितलेलं नाही, असं स्पष्टीकरण गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी दिलं आहे.

"मुख्यमंत्री निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यांनी माझ्याकडे कोणतंही स्पष्टीकरण मागितलेलं नाही. पक्षाचे प्रभारी माझ्याकडे स्पष्टीकरण मागतील, त्यावेळी जरुर माझी भूमिका स्पष्ट करेन", असं प्रकाश मेहता म्हणाले.

विरोधक आक्रमक

मुंबईतील ताडदेवच्या एसआरए घोटाळ्यामुळे, प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक आहेत.

गेल्या चार दिवसांपासून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत प्रकाश मेहतांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला आहे.

प्रकाश मेहतांवर एसआरए घोटाळ्याचा आरोप

मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर आहे. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप होत आहे.

3K च्या नियमात एका विकासकाला फायदा देण्यासाठी धोरण ठरवता येत नसल्याचं कारण सांगत गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी प्रस्तावाला विरोध केला होता. तसंच पीएपी (प्रकल्पबाधितांची घरं) संदर्भातही प्रस्तावावरही त्यांनी प्रतिकूल शेरा मारला होता.

पण मेहता यांनी ही फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता.

प्रस्तावाला अनुमती नाही : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रस्तावाला आपण कोणतीही अनुमती दिली नसल्याचं, तसंच आपली तोंडी परवानगीही घेतली नसल्याचं स्पष्ट केलं. आपल्याला हे प्रकरण कळल्यानंतर हा प्रस्ताव आपण रद्द केला असल्याचंही फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं.

नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करु नये : मेहता

आपण गृहनिर्माण विभागाच्या काही फायली घेऊन मुख्यमंत्र्यांकडे बैठकीला गेलो होतो, तेव्हा एम. पी. मिल कम्पाऊंडची फाईल नव्हती. मात्र ही फाईल घेऊन गेल्याच्या समजुतीतून आपण मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारल्याचे सांगत आपल्या नैतिकतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करु नये, असं प्रकाश मेहता यांनी सभागृहात सांगितलं.

संबंधित बातम्या

विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता 

मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश