मुंबई : सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. लिपिक, टंकलेखक, तलाठी या पदांसाठी मोठी भरती होणार असून, त्यासाठीच्या परीक्षांची तारीख जाहीर झाली आहे.


 

किती पदांसाठी भरती?

लिपिक-टंकलेखकच्या 521 रिक्त पदांसाठी भरती आहे, तर तलाठी संवर्गातील 1062 पदांसाठी भरती आहे. महसूल विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत आयोजित बैठकीत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी याबाबत माहिती दिली.

 

परीक्षा कधी?

 

लिपिक-टंकलेखकच्या 521 रिक्त पदांसाठी रविवार 4 सप्टेंबर रोजी, तर तलाठी संवर्गातील 1062 पदांसाठी रविवार 11 सप्टेंबर 2016  रोजी  परीक्षा घेण्यात येणार आहे.

 

महसूल विभागातील कामांमध्ये गती येणार- राठोड

 

तलाठी, लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे भरल्यास महसूल विभागातील कामांमध्ये आणखी गती येण्यास मदत होईल,असेही राठोड म्हणाले.

 

भविष्यात आणखी भरती

 

सज्जा पुनर्रचना समितीच्या  शिफारशी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी  सादर करण्यात येणार असून, यामुळे नवीन तलाठी सज्जांची निर्मिती व मंडळ अधिकारी कार्यालये निर्माण होणार असल्याने भविष्यात देखील तलाठी, लिपिक-टंकलेखक संवर्गातील अनेक पदे निर्माण होतील व ही पदे देखील पारदर्शक पद्धतीने भरण्यात येतील, असेही राठोड यांनी सांगितले.