मुंबई- राज्यात 11 मार्चला हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून 14 मार्चला ठरलेल्या तारखेला एमपीएससीची परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी मोठं आंदोलन केलं होतं. यावेळी पुण्यात विद्यार्थ्यांनी जोपर्यंत परीक्षा 14 मार्चला होतील हे सरकार निर्णय घेणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हलणार नाहीत असा पवित्रा घेतला होता. त्यावेळी कोरोना काळात एकत्र येण्यास बंदी असताना देखील विद्यार्थी रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरले त्यामुळे शासनाने लागू केलेल्या नियमांची पायमल्ली झाली आहे. हे कारण समोर करत राज्यभरात हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. 


विद्यार्थ्यांनी देखील गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे काही काळ राज्य सरकार विरुद्ध एमपीएससी करणारे विद्यार्थी असा संघर्ष उभा राहिला होता. परंतु त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधून परीक्षा 21 मार्चला होणार असल्याची माहिती दिली होती. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. त्यांनतर 21 मार्चला एमपीएससीच्या परीक्षा सुरळीत पार देखील पडल्या. परंतु यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांवर गुन्हे देखील दाखल झाले. 


याबाबत बोलताना राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले की, 11 मार्चला रस्त्यावर उतरून जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं ते उस्फुर्तपणे करण्यात आलं होतं. यामध्ये परीक्षा 14 मार्चला होणार नसल्याबाबतचा प्रचंड राग होता. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर मात्र विद्यार्थ्यांचा राग निवळला होता. एमपीएससी परीक्षा पास होताना विद्यार्थ्यांचे मुख्य मुलाखतीवेळी विद्यार्थ्यांवर कोणता गुन्हा दाखल आहे का हे देखील तपासले जाते. 11 मार्चच्या आंदोलनावेळी अनेक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. पुढील काळात हे विद्यार्थी परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना मुख्य मुलाखती वेळी गुन्हा दाखल असल्याबाबतची समस्या जाणवणार होती. ही बाब लक्षात ठेवून आज मी स्वतः राष्ट्रवादी पक्षाचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी केली. 


याला सकारात्मक प्रतिसाद देत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपण या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेऊ असं आश्वासन दिलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आगामी काळात जे नुकसान होणार होते ते टळणार आहे. याबाबत जयंत पाटील देखील सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं आहे. मुख्य मुलाखती मध्ये जर विद्यार्थ्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड सापडले तर नुकसान होऊ शकतं ही बाब समोर ठेऊन आपण लवकरच याबाबत सकारात्मक पाऊल उचलू असं पाटील म्हणाल्याची माहिती मेहबूब शेख यांनी दिली आहे.