मुंबई : दुसरी लाट ओसरतेय असं आपण म्हणू लागलो आहोत पण ती लाट संपूर्णपणे ग्राऊंड झीरो लेव्हलला यायच्या आधीच तोवर तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे की काय अशी परिस्थिती वाटू लागली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्यातील सात ते आठ जिल्ह्यात काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे, असं राज्याच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, व्हायरस आपले रुप बदलत आहे. नवीन उपप्रकार समोर येत आहेत. दुसरीकडे लसीकरण ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीनं होत नाही. कोविडसंबंधी पालन होताना दिसत नाही, यामुळं कोरोना रुग्ण वाढत आहेत. आज बेड्स आहेत, ऑक्सिजन उपलब्ध आहे पण आयसीयू बेड्स फुल व्हायला लागलेत, असं चित्र आहे.लोकशिक्षण, लोकजागर आणि उपाय या तीन गोष्टी एकत्र करत कोरोनोशी लढा द्यावा लागणार आहे, असं डॉ ओक म्हणाले.


शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि श्री राधा फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या 'इन्फोडोस' या डिजिटल जनजागृती अभियान आज सुरु झालं. यावेळी डॉ ओक बोलत होते.  


डॉ ओक म्हणाले की, तिसऱ्या लाटेचे अंदाज ही चुकूही शकतात. व्हायरस स्वतःचे स्वरूप बदलतो आहे. कोरोना व्हायरसचं चित्रं पाहिलं तर त्यात काटे दिसतात. यातील एक काटा जरी त्यानं बदलला तरी रुप बदलतं.  त्यामुळे तो किती लोकांना होऊ शकतो, सामाजिक अंतर किती पाळतो, लसीकरण किती या वर तिसरी लाट अवलंबून आहे. डेल्टा प्लसची इन्फेक्टिव्हिटी जास्त आहे. आधी सहा जणांच्या कुटुंबात एकाला व्हायचा हा सर्व कुटुंबाला होतो. डेल्टाचा प्रादुर्भाव खूप जास्त आहे, डॉ ओक म्हणाले.


डॉ ओक म्हणाले की, लसीकरण ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीनं होत नाही. लस ही पूर्ण व्हायरसच्या फॅमिलीविरोधात काम करते. लसीकरण जगात सुरू होऊन वर्ष झालेले नाही, मात्र वर्षभरात शक्यता आहे की बूस्टर डोस घ्यावा लागेल. लसीकरणाबाबत अजूनही खूप गैरसमज आहेत. ते जनजागृतीनं दूर करुन लसीकरण मोठ्या प्रमाणावर व्हायला हवं. भारतात तयार झालेल्या दोन्ही लसी या दोन्ही लस या सर्व व्हायरसच्या उपप्रकारावर परिणामकारक आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे कोरोनाविरोधात मास्क हा देखील महत्वाचं वॅक्सिन आहे. मास्क घालणं खूप महत्वाचं आहे, असं डॉ ओक म्हणाले. 


डॉ ओक म्हणाले की, लहान मुलां मध्ये किती परिणाम होईल सांगता येत नाही. लहान मूल 0 ते 18 यांच्या बाबत काम करीत आहोत. बोगस लसीकरणाबाबत टास्क फोर्समध्ये मी आहे मुद्दा घेतला आहे, हा मोठा गुन्हा आहे, यामुळे लसीकरणावर विश्वास उडतो आहे, असं ते म्हणाले.


या कार्यक्रमाला टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक, अभिनेत्री स्पृहा जोशी, खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर उपस्थित होते. खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, या उपक्रमाचे प्रत्येक रविवारी हे सेशन असेल, कोरोनाबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आहे. लसीकरणाबाबत महानगरपालिकेकडे जो साठा येत आहे, तो अपेक्षा प्रमाणे येत आहे. म्हणून राज्यात विक्रमी लसीकरण होत आहे, येत्या काही दिवसात मुंबईत पूर्ण लसीकरण होईल, महाराष्ट्राने या बाबत प्लॅन तयार केला आहे, असं ते म्हणाले.