Maharashtra Task Force On Coronavirus : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा  एकदा वाढू लागल्याने राज्य सरकार, प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी टास्क फोर्सने राज्य सरकारला महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत.  सार्वजनिक ठिकाणांसह गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची शिफारस टास्क फोर्सने केली आहे. मात्र, ही शिफारस मास्क सक्ती नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 


सोमवारी रात्री सरकारच्या टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने विविध मुद्यांवर चर्चा झाली. रुग्णालये, चित्रपटगृहे, बंदिस्त सभागृहे, मॉल्स या ठिकाणीही मास्कचा  अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


सध्या कोरोना रूग्णांमध्ये हे ताप प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे सर्व डॉक्टरांनी 99 अंश किंवा त्याहून अधिक ताप असलेल्या रुग्णांची योग्य दखल घेतली पाहिजे असेही टास्क फोर्सने आपल्या शिफारसीत म्हटले आहे.  RAT/RTCR चाचणी केली पाहिजे. संबंधित व्यक्तीची ही चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर जवळच्या संपर्कातील लोकांची चाचणी केली पाहिजे, असेही टास्क फोर्सने म्हटले आहे. 


कोरोनाबाधित व्यक्तींना होम क्वारंटाइन गरजेचे असल्याचे टास्क फोर्सने म्हटले आहे. त्याशिवाय, 50 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती, कोमॉर्बिड आणि लसीकरण न केलेल्यांची अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे. 


कोणती लक्षणे दिसल्यास रुग्णालयात दाखल करावे?


खोकला, श्वास लागणे, ताप कायम राहणे आणि आवाज बदलणे आणि घसा खवखवणे यासारखी  अतिरिक्त लक्षणे रुग्णालयात दाखल करणे योग्य राहील असेही टास्क फोर्सने सरकारला केलेल्या शिफारसीत म्हटले आहे. 


उपचाराचा मुख्य आधार लक्षणात्मक असणार आहे. ज्या रुग्णांना सतत उच्च पातळीचा ताप किंवा आजाराची लक्षणे 48 तास आहेत, ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा रुग्णांना मोलनुपिरावीर हे औषध दिले जाऊ शकते. गरोदर महिलांना हे औषध न देण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.


महाराष्ट्रात सोमवारी 1036 कोरोना रूग्णांची नोंद, सर्वाधिक नवे रुग्ण मुंबईत


महाराष्ट्रातील कोरोनाची सक्रिय रुग्ण संख्यादेखील वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात सोमवारी एकूण 7429 नवे सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5238 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी 374 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत 676 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सोमवारी कोरोनामुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.