मुंबई : राज्यातील कॉलेज सुरु (Maharashtra Collage Reopen ) करण्याबाबत मंत्री उदय सामंतांनी (Uday Samant) महत्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, कॉलेज सुरू करण्यासंदर्भात फाईल मुख्य सचिवांकडे गेली आहे. जरा काल मिस कम्युनिकेशन झालं होतं. काल काही अटोनॉमी असलेल्या कॉलेजने आपली कॉलेजेस सुरू केली आहे. आज आम्ही कॉलेज सुरू करण्यासंदर्भात सगळे निर्णय घेऊ, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, महाविकास आघाडीमध्ये समन्वय आहे. अजित पवार साहेबांचं माझ्याशी बोलणं झालं आहे. 11 आणि 12 वीचे कॉलेज सुरू झाले आहेत. आत्ता आम्ही पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आम्ही कॉलेज सुरू करणार आहोत, असं ते म्हणाले.
दुष्काळ मदतीबाबत बोलताना ते म्हणाले की, पंचनाम्याचे अहवाल आल्यावर शेतकऱ्यांना लवकर मदत मिळेल, असं मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, त्यांना मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. दसरा मेळाव्यावर बोलताना ते म्हणाले की, नाट्यगृहांमध्ये रोज कार्यक्रम होतात. पण आम्ही सगळे नियम पळून दसरा मेळावा साजरा करत आहोत. विरोधकांनी आपल्या कार्यक्रमात किती नियम पाळले आहेत. विरोधकांचं काम टीका करणं आहे, असंही ते म्हणाले.
पुण्यात सुरु झालेले कॉलेज पुन्हा बंद होणार का?
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घोषणेनंतर, कालपासून पुण्यात सुरु झालेले कॉलेज पुन्हा बंद होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण जोपर्यंत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून लेखी आदेश मिळत नाही, तोपर्यंत कॉलेज सुरु करणार नसल्याचं अनेक शिक्षण संस्थांच्या प्रशासनाकडून सांगण्यात येतं आहे. आज राज्यातील महाविद्यालयाबाबत निर्णय होणार आहे. पुण्यातील स्वायत्त महाविद्यालय सुरु झाली आहेत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अशी माहिती दिली होती.
कोरोना प्रादुर्भावामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. अशातच राज्यातील शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्यामुळं राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालयं आणि विद्यापीठं पुन्हा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला होता. परंतु काल या निर्णयाबाबत संभ्रम पाहायला मिळाला होता. आज याबाबतचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.