CM Uddhav Thackeray Discharged : Mumbai : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना तब्बल 22 दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी  मणक्याची शस्त्रक्रिया झाली. मुंबईच्या गिरगावातील प्रसिद्ध  एच. एन. रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. यादरम्यान त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला रुग्णालयातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. 


दरम्यान, मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज मिळाला त्यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आणि मुलगा आदित्य ठाकरे उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य केलं. आदित्य ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवली. साधारण 10 वाजून 34 मिनिटांनी मुख्यमंत्री आपल्या ताफ्यासह रुग्णालयातून बाहेर पडले. गिरगाव ते वर्षा बंगला हे जवळपास 4 किमीचं अंतर त्यांनी 8 मिनिटात पार केलं. मुख्यमंत्र्यांचा ताफा 10 वाजून 42 मिनिटांनी वर्षा बंगल्यावर दाखल झाला.    


पाहा व्हिडीओ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज



मुख्यमंत्र्यांवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया?  


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याचं सांगण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांवर मणक्याशी संबंधित महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉ. शेखर भोजराज यांनी मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया केली आहे. 


रुग्णालयातून मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 22 दिवस रुग्णालयात उपचार घेत होते. यादरम्यान त्यांनी राज्याचा कारभार रुग्णालयातून पाहिला. उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीला रुग्णालयातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. या बैठकीत कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन, शाळा सुरु करणे अशा विषयांवर चर्चा झाली होती.   


बेमोसमी पाऊस, अधिवेशन ते ओमायक्रॉनचं संकट  


राज्यात सध्या बेमोसमी पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक भागात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याशिवाय राज्याचं हिवाळी अधिवेशनही तोंडावर आहे. येत्या 22 डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यातच जगावर ओमायक्रॉन व्हेरिएंटचं संकट आहे. अशा विविध संकटातून राज्य जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा