मुंबई: राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाची चर्चा सुरु असताना भाजपकडून अनेक पातळ्यांवर मायक्रो-मॅनेजमेंट कसे सुरु असते, याचे उदाहरण समोर आले आहे. जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या (Vidhan Paridhad Election 2024) 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महायुतीकडून (Mahayuti) कोणाला संधी दिली जाणार, याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, ही चर्चा सुरु असतानाच भाजपने (BJP) आता वेगळ्याच ठिकाणी लक्ष केंद्रित केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने आता आपले लक्ष मविआ सरकारच्या काळापासून रखडलेल्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांकडे वळवले आहे. मविआ सरकारच्या काळात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 12 आमदारांची नियुक्ती अडवून धरली होती. त्यानंतर राज्यपालनियुक्त 12 आमदारांचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र, येत्या 4 जुलैला त्याबाबत महत्त्वाचा निर्णय होऊन 12 राज्यपालनियुक्त आमदारांच्या निवडीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यादृष्टीने भाजपने आतापासूनच हालचाली सुरु केल्या आहेत. 


येत्या 12 जुलैला विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या महायुतीच्या जागावाटपात भाजपचा वरचष्मा आहे. पाच जागांवर भाजप, प्रत्येकी दोन जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार उभे राहतील. तर उर्वरित दोन जागांवर मविआचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. त्यानंतर भाजप आता राज्यपालनियुक्त आमदारांची निवड मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 4 जुलैला न्यायालयातून राज्यपालनियुक्त आमदारांच्या नियुक्तीला हिरवा कंदील मिळेल, अशी आशा भाजपला आहे. हा मार्ग मोकळा झाल्यास लगेच आमदारांची नियुक्ती करता यावी, यासाठी भाजप आतापासूनच तयारीला लागला आहे. या 12 जागांपैकी जास्तीत जास्त जागांवर भाजपच्या नेत्यांची वर्णी कशी लागेल, यासाठी महाराष्ट्रातील भाजपनेतृत्त्व प्रयत्नशील असल्याचे समजते. त्यामुळे शिंदे गट आणि अजितदादा गटात काय पडसाद उमटणार, हे आगामी काळात बघावे लागेल.


निवडणुकीपूर्वी विधानपरिषदेच्या जागा भरण्याचा भाजपचा प्रयत्न


विधानसभा निवडणुकीपूर्वी विधानपरिषदेतील जास्तीत जास्त जागा भरुन घेण्याचा भाजप आणि महायुतीचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने भाजप सध्या पावले टाकताना दिसत आहे. 21 जूनला विधानपरिषदेच्या 5 आमदारांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. आज या विधानपरिषदेमधील 5 आमदारांचा निरोप समारंभ आहे. यात शिवसेनेच्या 2 आणि भाजपच्या 3 आमदारांचा समावेश आहे.  27 जुलैला आणखी 11 आमदार निवृत्त होणार आहे. आज विधानपरिषदेतून निवृत्त होणाऱ्या आमदारांमध्ये नरेंद्र दराडे (शिवसेना), रामदास आंबटक (भाजप), बिपल्व बाजोरिया (शिवसेना), प्रवीण पोटे पाटील (भाजप) आणि सुरेश धस (भाजप) यांचा समावेश आहे.


आणखी वाचा


विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसकडून मुस्लीम चेहऱ्याला संधी, उमेदवारीसाठी या तीन बड्या नेत्यांची नावं चर्चेत


भाजपच्या आठवी पास नरेंद्र मेहतांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केलं? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल