मुंबई : कोरेगाव-भीमा परिसरात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. शांततेत महाराष्ट्र बंद पाळण्याचं आवाहन करुनही या आंदोलनाला काहीसं हिंसक वळण मिळाल्याचं दिसत आहे. मुंबईत मध्य रेल्वेवर डोंबिवली, कांजुरमार्ग स्थानकावर तोडफोड करण्यात आली.


डोंबिवली स्टेशनवरील पूर्व भागातील तिकीटघर जमावानं फोडलं. दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
डोंबिवली स्टेशन आणि कल्याण दरम्यान पत्री पुलाजवळही लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रोखल्या होत्या.

दुसरीकडे, कांजुरमार्ग स्टेशनवर मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. 50 ते 60 जणांनी स्थानकावरील साईन बोर्ड, पोस्टर, स्टीलच्या खुर्च्या, पाणी प्यायचं मशिन, ट्यूबलाईट्स यांची तोडफोड करण्यात आली.



हार्बर रेल्वेवरील लोकल वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. त्याचप्रमाणे इतर मार्गांवरील वाहतूकही लवकरच पूर्वपदावर येईल, अशी हमी रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.