Maharashtra Assembly Session : सध्या दोन मातोश्री असून आम्ही तीन मजली मातोश्रीचं पावित्र्य राखतो.  आठ मजली मातोश्रीच्या पायऱ्या चढताना पाय दुखतात अशा शब्दात शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शिंदे गटाकडून विधानभवनाच्या पायऱ्यावर आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर भरत गोगावले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 


भरत गोगावले यांनी म्हटले की, आम्ही पोस्टर, बॅनरच्या माध्यमातुन वस्तुस्थिती मांडली आहे. सध्या मातोश्री दोन झाल्या आहेत. एक मातोश्री तीन मजली असून दुसरी मातोश्री आठ मजली आहे. आम्ही तीन मजली मातोश्रीचे पावित्र्य राखतोय. आठ मजली मातोश्रीच्या पायऱ्या चढताना पाय दुखतात असे गोगावले यांनी म्हटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कंत्राटी असल्याचे वक्तव्य केले होते. त्याबाबत विचारले असता गोगावले यांनी म्हटले की, कंत्राटी कर्मचारी 240 दिवसानंतर कायम कामगार होतो. शिंदे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांच्या घोषणा काही वेळ ऐकल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी  बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक लढत आहेत की रडत आहेत हे पाहिले असल्याचे गोगावले यांनी म्हटले. 


विरोधकांनी तीन दिवस घोषणाबाजी केली. आम्ही दोन दिवस घोषणाबाजी केली. आम्ही केलेली घोषणाबाजी त्यांना बोचली आहे. आम्हाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न करू नका, आमच्या अंगावर कोणी येऊ असा इशारा गोगावले यांनी दिला. प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहावे. आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. आम्ही मर्द आहोत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत असेही गोगावले यांनी म्हटले.


उद्धव ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी नवीन इमारत बांधली असल्याची चर्चा होती. या इमारतीला मातोश्री-2 असे संबोधण्यात येते. राज्यात भाजप-शिवसेनेची 2014 ते 2019 दरम्यान सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री-2 च्या भूखंडासाठी मदत केली असल्याचे म्हटले जात होते.


आदित्य ठाकरे लक्ष्य 


विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाच्या आमदारांनी थेट शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाच लक्ष्य केले आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळांच्या पायऱ्यावर आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट्या दिशेने बसलेल्या व्यंगचित्राचे बॅनर झळकावत घोषणाबाजी केली. 


विधीमंडळ अधिवेशनात शिवसेना आणि महाविकास आघाडीत संघर्षाची ठिणगी पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. विधीमंडळ अधिवेशन सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारपासून शिंदे गटानेही महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेविरोधात घोषणाबाजी सुरू केली. बुधवारी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात बाचाबाचीदेखील झाली होती. 


पाहा व्हिडिओ: Bharat Gogawale UNCUT : आम्ही हात बांधून बसणार का? मर्द आहोत, मर्यादेत रहा