शिवसेनेला नगर विकास शिवाय इतर कुठलं महत्त्वाचं खात मिळत नव्हतं. शिंदे यांनी गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम मधला एमएसआरडीसी यावर आग्रह धरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गृहमंत्रालयावरूनही शिवसेना राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू आहे. ग्रामीण महाराष्ट्राशी निगडित असलेली कृषी, सहकार, ग्रामविकास ही खाती प्रत्येकी तिघात वाटून घेतली जाणार आहेत. राष्ट्रवादी कृषी, काँग्रेस सहकार, आणि शिवसेना ग्राम विकास मिळण्याची शक्यता आहे. पुन्हा स्वतंत्र बैठका करून उद्या सकाळी अकराच्या दरम्यान पुन्हा तीन पक्षांची एकत्रित बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान आज मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टेबल वाजवून निर्णयाचं स्वागत केलं. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांची मात्र यासाठी सहमती नसल्याची माहिती आहे.
आजच्या बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांना सांगितले की, मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्व पक्षांनी संमती दर्शवली आहे. पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला होता, अशी माहिती मिळत आहे. तसेच महाविकासआघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनीच करावं, असा सूर या बैठकीत पाहायला मिळाला.
मुख्यमंत्री हा महाविकासआघाडीमधील सर्व पक्षांच्या आमदारांचे, गटनेत्यांचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना असे वाटते की, उद्धव ठाकरे यांनीच महाविकास आघाडीचे नेतृत्व करावे. महाविकासआघाडीच्या मंत्रीमंडळात दोन माजी मुख्यमंत्री, दोन माजी उपमुख्यमंत्री, तसेच आतापर्यंत अनेकवेळा कॅबिनेट मंत्रीपदं भूषवलेले नेते असणार आहेत. त्यामुळे अशा नेत्यांचे नेतृत्व करण्याची क्षमता केवळ उद्धव ठाकरेंमध्येच आहे, असे आघाडीतील नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सर्वसंमती झाली आहे.