मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन जवळपास निम्मा कार्यकाळ लोटला आहे. एप्रिल महिना महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. चालू एप्रिल महिन्यात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांचे संकेत मिळत आहेत. याकरता येत्या आठवडाभरातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडी समोर असलेली आव्हानं आणि अंतर्गत नाराजीबाबतही चर्चा होऊ शकते.


सध्या महाविकास आघाडीतल्या तीन चाकांमध्ये अंतर्गत कुरबुरीचा आवाज यायला लागला आहे. ही कुरबुर मिटवण्यासाठी आणि भाजपच्या माऱ्यासमोर महाविकास आघाडीला मजबूत कसं ठेवता येईल याकरताच येत्या आठवडाभरात वर्षा बंगल्यावर रणनीती तयार केली जाणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीतले चाणक्य म्हणून ओळखले जाणारे खुद्द शरद पवारही उपस्थित असतील.


भाजपकडून सातत्याने होणारी टीका, केंद्रीय यंत्रणांची छापेमारी याने महाविकास आघाडी ग्रासली आहे. त्यामुळे गृहखात्याकडूनही भाजप नेत्यांना कडक प्रत्युत्तर दिलं जावं, अशी महाविकास आघाडीतल्या अनेकांची भावना आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटली यांच्या भूमिकेवरुन शिवसेनेच्या नाराजीची चर्चा सुरु असतानाच काँग्रेसनेही गृहमंत्र्यांविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे.


महाविकास आघाडीतली रिक्त मंत्रिपदे, काही खातेबदल आणि विधानसभा अध्यक्षपदाचा पेच यावरही प्रामुख्याने चर्चा होणं अपेक्षित आहे. विशेषत: गृहखात्याबाबत उघड आणि छुपी नाराजी व्यक्त होत असताना राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्याबाबतही महत्त्वाचे निर्णय खुद्द शरद पवारांच्या उपस्थितीत घेतले जाऊ शकतात.


दोन मंत्र्यांचे राजीनामे, विधानसभा अध्यक्षपद रिक्त
तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. सध्या हे खातं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख गृहमंत्रिपदावरुन पायउतार झाले. सध्या देशमुख हे ईडीच्या अटकेत आहे. देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहखात्याची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आली. तर काँग्रेसकडे असलेले विधानसभेचे अध्यक्षपद एक वर्षापेक्षा अधिक काळ रिक्त आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन जवळपास निम्मा कालावधी लोटत आला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा सुरु आहे.