Lok Sabha Elections 2024: पुढच्या वर्षी देशात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Elections) रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. राज्यातही आगामी लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय (Maharashtra Politics) पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांच्या महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) कंबर कसली आहे. पण, येत्या काळात जागावाटपावरुन मविआमध्येही जुंपण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच महाविकास आघाडीत असलेला ठाकरे गट (Thackeray Group) मुंबईतील (Mumbai News) सहापैकी चार जागांवर आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. 


मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार जागांवर ठाकरे गट आग्रही असल्याचं दिसत आहे. मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा असून त्या सहा जागांसाठी महाविकास आघाडीचा 4-1-1 असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. मुंबईतील लोकसभा मतदार संघनिहाय आढावा बैठक मातोश्रीवर उद्धव ठाकरे घेत आहेत. अशातच मुंबईतील सहा जागांपैकी चार जागांवर ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. 


ठाकरेंचं ठरलं; दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, तर उत्तर पश्चिम लोकसभेसाठी अमोल किर्तीकर


मुंबईतील दक्षिण मुंबई दक्षिण, मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई या चार लोकसभांच्या जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती आहे. यामध्ये दक्षिण मुंबईसाठी विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि उत्तर पश्चिम लोकसभेच्या जागेसाठी अमोल किर्तीकर यांना ठाकरे गटाकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. तर ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या लोकसभेच्या जागेसाठी ठाकरे गटाची चाचपणी सुरू असून या दोन जागांसाठीचा उमेदवार अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. दक्षिण मध्य मुंबई ही जागा मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं निवडून आणली होती. मात्र सध्या त्या ठिकाणी असलेले खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटात आहेत. त्यामुळे राहुल शेवाळे यांच्या विरोधात ठाकरे गट कोणता उमेदवार देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर ईशान्य मुंबई लोकसभेची जागा ही सेना भाजप युतीमध्ये भाजपसाठी देण्यात आली होती. जिथे भाजपचे खासदार मनोज कोटक आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे गट उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. मात्र उमेदवारांसंदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती मिळत आहे. 


ईशान्य मुंबईतून संजय राऊत लोकसभेच्या रिंगणात? 


ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी मतदार मोठ्या संख्येनं आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या नावाची देखील चर्चा लोकसभेच्या उमेदवारीसाठी आहे. मात्र यावर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. तर उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन जागा महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना देण्याची ठाकरे गटाची तयारी असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे मुंबईतील सहा लोकसभा जागांसाठी 4-1-1 फॉर्मुला ठरवण्यासाठी ठाकरे गटाचा आग्रह असेल, अशी माहिती सूत्रांच्या वतीनं मिळत आहे.