मुंबई : शस्त्र परवाना काढण्यासाठी राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या नावाने व्यावसायिकाला गंडा घातल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका भामट्याला अटक केली आहे. अतुल पेठे असे या भामट्याचे नाव असून तो ठाण्यात राहतो.
अंबरनाथमध्ये राहणाऱ्या उमेश पवार यांनी शस्त्र परवाना काढण्यासाठी अर्ज केला होता. यावेळी तुमचे काम गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याद्वारे करून देतो, असे आमिष दाखवत अतुल पेठे या भामट्याने पवार यांच्याकडून तब्बल साडेनऊ लाख(9.50 लाख)रुपये उकळले आहेत. परंतु वर्ष उलटूनही परवाना न मिळाल्याने पवार यांनी चौकशी केली असता त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याचे त्यांना समजले.
अर्ज फेटाळल्याची माहिती मिळताच पवार यांनी भामट्या पेठेकडे त्याबाबत चौकशी केली. त्यावर पवार यांना पेठेने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पवार यांनी पोलिसांत धाव घेत याबाबतची तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पेठे याला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी पेठे याच्याकडे अधिक चौकशी केली, तसेच याबाबत तपास केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पेठे हा काही वर्षांपूर्वी एयर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून काम करत होता. यापूर्वीही पेठेवर आठ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु गृहराज्यमंत्री रणजित पाटील किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांशी पेठे याचा संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
गृहराज्यमंत्र्यांच्या नावाने व्यावसायिकाला गंडा, शस्त्र परवान्यासाठी साडेनऊ लाख रुपये लाटले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Mar 2019 06:59 PM (IST)
शस्त्र परवाना काढण्यासाठी राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या नावाने व्यावसायिकाला गंडा घातल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका भामट्याला अटक केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -