मुंबई : देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, टीडीपीचे चंद्राबाबू नायडू, आम आदमी पक्षाचे प्रतिनिधी, डीएमकेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. आजच्या बैठकीत निवडणूक आयोग, ईव्हीएमबाबत तक्रारी, VVPAT बद्दल चर्चा झाली.


भाजपकडून ईडी, आयकर विभाग, सीबीआय यांचा गैरवापर होत आहे. देशातील संस्थांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जात आहे. निवडणूक आयोग देखील याला अपवाद नाही. निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीनबरोबर छेडछाड होत आहे, असा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. आम्ही मागच्या अनेक दिवसांपासून ईव्हीएम मशीन प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. आमच्या निदर्शनास आले आहे की, ईव्हीएम मशीन मॅनिप्युलेट केली जाऊ शकते, असं चंद्राबाबू यांनी सांगितलं.


महाराष्ट्रात भाजपची अवस्था वाईट आहे. याठिकाणी सर्व जागा आघाडीने जिंकल्या पाहिजेत. उत्तर प्रदेशमध्ये देखील भाजपविरोधात वातावरण आहे. त्यामुळे फक्त ईव्हीएम मशीन हॅक करून भाजपकडे मतदान फिरवलं जातं, असा गंभीर आरोप चंद्राबाबू नायडूंनी केली.


अनेक मतदारसंघात फिरल्यानंतर लक्षात आलं की लोकांमध्ये सरकारविरोधी भावना आहे. सरकारच्या कारभारावर लोक नाराज आहे. मात्र ईव्हीएम मशीन हॅक करुन किंवा ईव्हीएम मशीनमध्ये गडबड केली जाऊ शकतो, असं शरद पवार यांनी म्हटलं.