मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे महायुतीपासून दूर गेल्याचं दु:ख झाल्याचं दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. महादेव जानकर 'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर आपली प्रतिक्रिया दिली.


राजू शेट्टी यांना महायुती सोडून जाऊ नका, अशी विनंती मी केली होती. मात्र भाजप नेतृत्व आणि त्यांच्यात मतभेद असल्याने, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजू शेट्टींनी वेगळं होण्याच निर्णय घेतला, अशी माहिती महादेव जानकर यांनी दिली. महायुतीत भाजप मोठा भाऊ आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद कमी असल्याने महायुतीच्या निर्णय प्रक्रियेत आमचा सहभाग कमी आहे. सर्वांना थांबवून ठेवण्याचे अधिकार मला नव्हते. त्यामुळे राजू शेट्टी महायुतीतून गेल्याचं दु:ख असल्याची भावना महादेव जानकारांनी बोलून दाखवली.


काँग्रेस-राष्ट्रवादीने शेतकऱ्यांचा सर्वाधिक शोषण केलं आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत न जाण्याची विनंतीही मी राजू शेट्टी यांना केली होती, अशी माहिती महादेव जानकर यांनी दिली. विनायक मेटे राजकारणात माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांना सल्ला देण्याइतका मी मोठा नाही, असं महादेव जानकर यांनी सांगितलं.



धनगर आरक्षणाचा दिलेला शब्द मुख्यमंत्री खरा करतील 


धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना महादेव जानकर म्हणाले की, मी राष्ट्रीय समाज पक्षाचा नेता आहे. त्यामुळे मी केवळ धनगर समाजाचा नेता नाही. राज्याला आज देवेंद्र फडणवीसांसारखा सक्षम मुख्यमंत्री मिळाले आहेत. मुखमंत्री जो शब्द देतात तो खरा करुन दाखवतात. आज केवळ धनगरांचा नेता होणे बरं नाही, सर्व समाजाचा नेता होणे आवश्यक आहे. तसेच सरकारने पूर्ण समाधान केलं असल्याने आज आम्ही धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक नसल्याचं स्पष्टीकरण महादेव जानकरांनी दिलं.


पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत सभा का घेत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर देताना महादेव जानकर म्हणाले की, नरेंद्र मोदी यांचा कोणताही नियोजित दौरा याठिकाणी नव्हता. मात्र भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी बारामतीत हजेरी लावली. बारामतीत राष्ट्रवादीला पराभूत करण्याचा नरेंद्र मोदींचा मानस आहे. विरोधकांची आघाडी निर्माण करण्यात शरद पवारांची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी निश्चितपणे शरद पवार यांच्याविरोधात आहेत, असं महादेव जानकरांनी सागितलं.


शरद पवार कष्टाळू नेते 


शरद पवारांची स्तुतीही यावेळी महादेव जानकर यांनी केली. शरद पवार कष्टाळू नेते आहे. आजही ते देशभर दौरे करतात. शरद पवार यांच्याशी माझं वैयक्तिक वैर नाही. केवळ राजकीय मतभेद आहेत. पवारसाहेब देश तसा वेश असं वागणारे राजकीय नेते आहेत, असं महादेव जानकरांनी सांगितलं.


राज्यात दुधाचा ब्रँड विकसित करण्यासाठी प्रयत्न करणारा मी एकमेव दुग्धविकास मंत्री आहे. मात्र काही गोष्टीमध्ये मी कमी पडलो. जनता, प्रशासन यांच्या सांगड घालण्यात आम्ही कमी पडल्याचं महादेव जानकरांनी सांगितलं. मात्र ज्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार पुन्हा राज्यात येईल, त्यावेळी 'आरे' नावाचा ब्रँड राज्यात असेल, असं आश्वासनही महादेव जानकरांनी दिलं.


संबंधित बातम्या


तोंडी परीक्षा | पार्थ पवारांनी आजोबा, आत्याला कर्ज दिलं; सुप्रिया सुळे म्हणतात...


तोंडी परीक्षा | सुजय सगळ्यांचे पानिपत करायला समर्थ, तो जिंकणारच, राधाकृष्ण विखे पाटलांचा विश्वास


तोंडी परीक्षा | प्राध्यापक भरती प्रक्रिया सरकारी अधिकाऱ्यांमुळे रखडली, विनोद तावडेंचा आरोप


तोंडी परीक्षा : ...तर शरद पवार पंतप्रधान व्हावे : संजय राऊ


तोंडी परीक्षा | मुलंच नाही तर नातवंडंही पळवू : गिरीश महाजन