मुंबई : लोकमंगलने दूध भुकटीसाठी बनावट कागदपत्रे सादर करुन अनुदान लाटल्याप्रकरणी चौकशीचे निर्देश देणाऱ्या, दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त आर आर जाधव यांची बदली करण्यात आली आहे. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेतली, त्याच दिवशी संध्याकाळी हे प्रकरण उघडकीस आणणारे दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त आर आर जाधव यांची बदली केल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.

सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टिस्टेस्ट सहकारी संस्थेने दूध भुकटीसाठी बनावट कागदपत्रे सादर करुन 24 कोटी 81 लाख रुपयांचं अनुदान लाटल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला होता. अनुदान मंजूर करण्यासाठी सुभाष देशमुख यांनी सादर केलेली बहुतांश कागदपत्रे बनावट असल्याचं निरुपम म्हणाले होते. माहिती अधिकारातून ही बाब समोर आल्याचं त्यांनी सांगितलं.

लोकमंगल प्रकरणात आयुक्त आर आर जाधव यांनी 25 सप्टेंबर रोजी पुण्यातील प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश दिले होते. तसंच चौकशी पूर्ण होईपर्यंत लोकमंगलला पैसे देऊ नये, असा आदेशही दिला होता. मात्र हे प्रकरण प्रसारमाध्यमात आणल्यावर त्याच दिवशी आयुक्त जाधव यांची बदली झाल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराला संरक्षण देत आहेत, असा आरोप निरुपम यांनी केला आहे. तसंच सुभाष देशमुख, त्यांचा मुलगा आणि संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही संजय निरुपम यांनी केली आहे.