Mumbai Megablock : मध्य रेल्वेकडून मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी (16 जुलै) रोजी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे.  अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई लोकलमधील माटुंगा ते ठाणे या मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.


माटुंगा मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावरून सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.15 या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान सेवा या जलद मार्गावरुन वळवण्यात येणार आहेत. तर या गाड्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबणार आहेत. पुढे मुलुंड स्थानकावर धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेहून 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.


सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 या वेळेत ठाण्याहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांवर थांबवून अप जलद मार्गावर माटुंगा स्थानकावर वळवण्यात येतील आणि ते स्थानकावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.


हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक 


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे डाउन  हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर  सकाळी 11.10 ते 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते  पनवेल मार्गावरील सेवा  सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत बंद राहणार आहेत. तर तसेच पनवेल ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सकाळी  9.53 ते दुपारी 3.20 कालावधी मध्ये पूर्णपणे ठप्प राहणार आहेत. 


दरम्यान ब्लॉक कालावधीमध्ये मुंबई  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला स्थानकादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. तर वाशी ते पनवेल दरम्यान देखील विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. 


पश्चिम मार्गावरील राम मंदिर ते बोरीवली स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आली आहे. तसेच रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच नागरिकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन देखील करण्यात येत आहे. एकीकडे सुरु असलेल्या पावसामुळे नागरिकांना आधीच प्रवासासाठी अडचणी निर्माण होत आहेत.