MegaBlock On 2nd Jan sunday : मध्य रेल्वेवर आज ठाणे ते दिवा या स्थानकांच्या दरम्यान 24 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या मेगाब्लॉक दरम्यान दोन मोठी कामं हाती घेण्यात आली आहेत. सगळ्यात मोठं काम कळवा स्थानकाच्या पुढे सुरु आहे. गेल्या ब्लॉकच्या वेळी जुन्या मार्गिका तोडून नवीन मार्गिकांना जोडण्यात आल्या होत्या. त्याच जुन्या मार्गिका पुन्हा तोडून पूर्वीच्या मार्गिकांना जोडण्यात येणार आहेत.
दुसरं काम कळवा खाडीजवळ निर्माण करण्यात आलेल्या खाडी पुलावर सुरु आहे. मुंब्रा स्थानकाच्या आधी हे खाडीपूल आहेत. जुन्या बोगद्यातून येणाऱ्या जुन्या मार्गिका या खाडी पुलावरून जाणाऱ्या मार्गिकांना जोडण्यात आल्या आहेत. त्याच नवीन मार्गिकांचे लोड टेस्टिंग आज केले जाणार आहे. या दोन्ही नवीन मार्गावरून आज काही गाड्या चालवल्या जातील आणि त्याचे परीक्षण करून त्या मार्गिका सुरक्षित आहेत की, नाही ते तपासले जाईल. त्यासाठी कमिशनर ऑफ रेलवे सेफ्टी या साईटवर आले आहेत.
या कामामुळे उद्यापासून कोणते बदल होतील?
आजचा 24 तासांचा ब्लॉक झाल्यानंतर उद्यापासून कळवा आणि दिवा स्थानकांच्या दरम्यान ज्या धीम्या लोकल चालवल्या जातील, त्या नवीन बांधलेल्या मार्गिकेवरून वरून धावतील. म्हणजेच, मुंब्रा स्थानकात तयार करण्यात आलेल्या नवीन प्लॅटफॉर्मवर उद्यापासून धीम्या लोकल थांबणार आहेत. आणि कळवा मुंब्रा दरम्यान निर्माण करण्यात आलेल्या नवीन बोगद्यातून लोकल न धावता पुन्हा जुन्या बोगद्यातून त्या धावणार आहेत.
मध्य मार्गावर 24 तासांचा जम्बोब्लॉक
रविवारी दोन जानेवारी 2022 रोजी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रल्वेचा मेगा ब्लॉक हा 24 तासांचा असणार आहे. ठाणे-दिवा मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. तर, हार्बर मार्गावरही दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
2 जानेवारी पासून रेल्वे ठाणे-दिवा मार्गावर 24 तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे. रविवारी मध्यरात्री 2 वाजल्यापासून ते सोमवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. एक जानेवारीला रात्री 11.43 पासून ते दोन जानेवारीला रात्री 11.43 पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप आणि जलद गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थाबंणार नाहीत. पुढे मुलंड स्थानकावर अप धीम्याा मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. त्यामुळे या सर्व लोकल नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे उशीराने पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणाऱ्या डाऊन धीम्या, अर्ध जलद सेवा मुलुंडहून दोन जानेवारी रोजी 5.05 पासून ते 3 जानेवारी मध्यरात्री 1.15 पर्यंत मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. या लोकल कळवा, मुंब्रा, कोपर व ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा