Harbour Local Disrupts : मुंबईतील (Mumbai) हार्बर रेल्वे मार्गावरील (Harbour Railway Line) वाहतूक आज काही काळ बंद झाल्याने प्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशी मनस्ताप सहन करावा लागत आहे. हार्बर लाईनवर गोवंडी (Govandi) इथे रुळाला तडे गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी 8 वाजून 27 मिनिटांनी रुळाची दुरुस्ती करुन वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. पण लोकलची वाहतूक अजूनही उशिरानेच सुरु आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकावर आणि लोकलमध्ये मोठी गर्दी झाली आहे.


नवी मुंबई, पनवेलवरुन मोठ्या प्रमाणात नागरिक हार्बल मार्गावरील लोकलने मुंबईला येत असतात. परंतु गोवंडी स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतूक ठप्प झाली. परिणामी स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दुरुस्ती झाली असतून वाहतूक अद्यापही पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही. त्यामुळे स्थानकांवर गर्दीचे लोट कायम आहेत. सीबीडी आणि वाशीमधील लोक मोठ्या प्रमाणात मुंबईला जात असतात. परंतु लोकलचा खोळंबा झाल्याने हे लोक स्थानकातून बाहेर पडत सायन-पनवेल महामार्गावरुन आता बस किंवा खासगी वाहनाला पसंती देत आपलं ठिकाण गाठत आहे. 


सीएसएमटी स्थानकावर काल लोकलचा अपघात
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात मंगळवारी (26 जुलै) लोकलचा छोटा अपघात झाला होता. त्यामुळे हार्बर मार्गावरील (Harbour Line) सेवा विस्कळीत झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर  सकाळी 9 वाजून 39 मिनिटांनी CSMT वरुन पनवेलला जाणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर होती. तिला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर लोकल पुढे जाण्याऐवजी ती लोकल मागे आली आणि बफरला धडकली. त्यामुळे लोकलचे डब्बा रुळावरुन घसरला. या घटनेत कोणलाही दुखापत झाली नाही. यामध्ये लोकलचा मागून चौथा कोच रुळावरुन घसरला होता. या अपघातामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. हार्बर मार्गावरील अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या होत्या. अपघातानंतर सर्व प्रकारच्या यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी कोच पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न केले. दोन तासांत रुळावरुन दुरुस्ती झाली आणि घसरलेली लोकल दुपारी 12.11 मिनिटांनी कारशेडच्या दिशेने रवाना झाली.