मुंबई : वेगवेगळ्या स्थानकादरम्यान पावसाचे पाणी साचल्याने दरवर्षी लोकल बंद पडते. त्यावर एक अद्ययावत उपाय मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शोधला आहे. त्यानुसार सात स्थानकांच्या दरम्यान मायक्रो टनेलिंग करण्यात येणार असून त्याद्वारे पर्जन्य वाहिन्या तयार करण्यात येणार आहेत. यातील आतापर्यंतचे सर्वात जास्त लांबीचे मायक्रो टनेलिंग सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ करण्यात येत आहे.
नेमेचि येतो पावसाळा, तसेच पावसाळ्यात नेमेचि होते लोकल बंद, असेच मुंबईकर म्हणतात. आता तर पहिल्या पावसात काय, मान्सून पूर्व पावसात देखील ट्रॅक वर पाणी साचल्याने लोकल बंद पडते. ही समस्या सोडवण्यासाठी आजतागायत रेल्वे आणि मुंबई महपालिकेकडून असंख्य उपाय योजना करण्यात आल्या. मात्र त्याचा काहीही फायदा दिसून आलेला नाही. पण मध्य रेल्वेला आता पाणी साचू नये यासाठी रामबाण उपाय सापडलाय असेल म्हणावे लागेल.
सध्या मुंबईत जमिनी खालून जाणाऱ्या मेट्रो 3 चे काम सुरू आहे. त्यासाठी जमिनीखाली टनेल बोरिंग मशीन चालवण्यात येत आहेत. त्याच प्रकारचे मात्र आकाराने लहान असलेले मायक्रो टनेल बोरिंग मशीन म्हणजे एमटीबीएम रेल्वे वापरत आहे. त्याचा वापर करून सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ भारतीय रेल्वेतील सर्वाधिक लांबीचे मायक्रो टनेल बनवण्यात येत आहेत. स्टेशनपासून थेट अरबी समुद्रापर्यंत आम्ही एमटीबीएमने खोदून त्यात मोठे पाईप टाकत आहोत. हे पाईप 1.8 व्यासाचे आहेत तर मायक्रो टनेलची एकूण लांबी 470 मीटर इतकी आहे. भरतीचे पाणी पुन्हा आत येऊ नये यासाठी आम्ही फ्लडगेट बसवले आहेत. येत्या जुलै महिन्यात हे काम पूर्ण होईल, असे उर्मी कन्स्ट्रक्शनच्या जीएम सुनीता सिंग यांनी सांगितले.
या तंत्रज्ञानाचा वापर याआधी 2 ठिकाणी करण्यात आला आहे. आणि तिथे यावर्षी पाणी साचले नाही. त्यामुळेच आता 7 स्थानकात असे मायक्रो टनेलिंग करून मुंबई लोकल पावसात देखील सुरू ठेवणार असल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी सांगितले आहे. मुंबई लोकल पावसाळ्यात बंद पडणार नाही यासाठी आम्ही नवीन मायक्रो टनेलिंगचे प्रकल्प करत आहोत. एकूण सात ठिकाणी हे प्रकल्प उभे करून पावसाच्या पाण्याला वाहून जायला पर्जन्य वाहिन्या निर्माण केल्या जातील, त्यामुळे रुळांवर पाणी साचणार नाही आणि लोकल धावू शकेल, असं मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी सांगितले.
कुठे उभारण्यात येणार हा प्रकल्प?
मध्य आणि पश्चिम रेल्वेची काही मोजकी स्थानके आहेत ज्यात दरवर्षी पाणी साचते. त्यामुळे रेल्वे आणि मुंबई महापालिका मिळून मायक्रो टनेलिंगचे प्रकल्प उभे करते आहे. त्यापैकी सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद बंदर स्थानकात मायक्रो टनेलिंगचे काम पूर्ण होत आले आहे. तर येणाऱ्या काळात, कुर्ला, सायन, वांद्रे, नालासोपारा, वसई या स्थानकात देखील असेच प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. हे प्रकल्प उभे राहिल्यानंतर मुंबई लोकल पावसात देखील थांबणार नाही असा दावा करण्यात येतोय.
मुंबई पावसात तुंबणार नाही आणि लोकल बंद पडणार नाही असे दावे दरवर्षी करण्यात येतात. मात्र आजपर्यंत हे दावे कधीच खरे झालेले नाहीत. जर मध्य रेल्वेच्या या नव्या प्रकल्पामुळे खरंच लोकल भर पावसात जर धावली, तर मुंबईकरांचा त्रास नक्कीच कमी होईल यात शंका नाही.