ED Raids LIVE UPDATES | आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग ईडी कार्यालयात दाखल
अंमलबजावणी संचालनालयाची पथकं आज सकाळी आठ वाजता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचली आणि शोधमोहीम सुरु केली. मुंबई, ठाणे परिसरातील दहा ठिकाणी ईडीकडून शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई केली जात आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु आहे.
पार्श्वभूमी
ठाणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयाचं पथक पोहोचलं आहे. याशिवाय त्यांचे पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजता दाखल झाले आहेत. एकूण दहा ठिकाणी मुंबई, ठाणे परिसरात शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु आहे. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रनौत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई होत असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून प्रतिक्रिया देऊ, असं पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आहे.
दिल्लीच्या टीमच्या नेतृत्त्वात ही कारवाई सुरु आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. यामुळे भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं. याचाच वचपा काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ईडीच्या माध्यमातून शिवसेना नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची चर्चा रंगली आहे.
राजकारणासाठी अशा संस्थांचा वापर : बाळासाहेब थोरात
प्रताप सरनाईक यांच्या घरात ईडीने शोधमोहीम सुरु केल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "अशा संस्थांचा वापर राजकारणासाठीच केला जातो," असा हल्लाबोल बाळासाहेब थोरात यांनी केला. "भाजपशासित राज्यातील नेत्यांवर अशी कारवाई झाल्याचं ऐकीवात नाही. परंतु भाजपच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना त्रास होतो," असंही थोरात म्हणाले.
प्रताप सरनाईक यांची कोणकोणत्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका
- शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक हे ठाणे जिल्ह्यातील माजीवडा मतदारसंघातून सलग तीन टर्म आमदार आहेत.
- मीरा-भाईंदर परिसराची जबाबदारीही त्यांच्यावर आहे.
- प्रताप सरनाईक सातत्याने भाजपविरोधात आक्रमक पद्धतीने बोलत असतात
- कलर्स चॅनलच्या बिग बॉसमध्ये गायक कुमार सानू यांचा पुत्र जान सानूने मराठी भाषेविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात प्रताप सरनाईक यांनी आक्षेप घेतला आहे.
- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणला होता.
- मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत करणारी अभिनेत्री कंगना रनौतविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.
टॉप ग्रुपशी संबंधित प्रकरणावरुन सरनाईकांच्या घरी ईडी : सूत्र
राहुल नंदा यांच्या टॉप्स ग्रुपवर सुमारे 350 कोटी रुपये हवालामार्फत देशाबाहेर नेल्याचा आरोप आहे. राहुल नंदा सध्या आपल्या कुटुंबासह दुबईमध्ये असल्याची माहिती आहे. ईडीच्या माहितीनुसार राहुल नंदा यांनी लॉकडाऊनदरम्यान चार राष्ट्रीयकृत बँकांकडून सुमारे 175 कोटी रुपये कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी कर्ज घेतलं. याशिवाय मागील काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैस जमा न करता तो पैसा आपल्या दुसऱ्या कंपनीत गुंतवला. अशाप्रकारे 100 कोटी रुपयांची संपत्ती देश आणि देशाबाहेर जमा केली आहे. टॉप्स कंपनीला त्यांच्या क्लायंटकडून मिळालेले सुमारे 75 कोटी रुपये आपल्या खासगी बँक खात्यात ट्रान्सफर करुन तो पैसा परदेशी बँकांमध्ये गुंतवल्याचा आरोप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल नंदा आणि प्रताप सरनाईक यांची मैत्री आहे. ईडीला मिळालेल्या माहितीनुसार दोघांवर काही आर्थिक संबंध आहेत का याचा तपास ईडी करत आहे.
संबंधित बातमी
ईडी आणि इतर यंत्रणांनी राजकीय पक्षाच्या शाखेप्रमाणे वागू नये : संजय राऊत
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -