राज्यात आज मराठा संघटनांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी किरकोळ घटना वगळता, बंदमध्ये कुठलाही अनुचित प्रकार झाला नाही.
औरंगाबादेत मराठा आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. संतप्त जमावाने अग्नीशमन दलाची गाडी फोडून ती जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली.
मुंबई बंद
मराठा मोर्चाकडून आज (25 जुलै) मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. काल मुंबईत मराठा मोर्चा समन्वयकांची बैठक पार पडली. बंदवेळी कुठल्याही प्रकारची हिंसा करु नका असं आवाहन करायलाही मोर्चाचे समन्वयक विसरले नाहीत. तसंच आजच्या बंदमध्ये कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, तोडफोड होणार नाही, याची काळजी घेण्यासही मोर्चाकडून बजावण्यात आलं आहे.
सरकारकडून मदत जाहीर
दरम्यान, सरकारकडून काकासाहेब शिंदे यांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये आणि भावाला आठवडाभरात सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला या दोघांना निलंबित करण्यात आलं आहे.
LIVE UPDATE (24 जुलै)
6.18 PM - शिर्डी - कोपरगावात शोले स्टाईल आंदोलन, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची पाण्याच्या टाकीवर चढून निदर्शनं
5.40 PM - मराठा क्रांती मोर्चाकडून उद्या अकोला बंदचं आवाहन
5.26 PM - नाशिक : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना नाशिक पोलिसांची नोटीस, कायदा सुव्यवस्था, शांततेचा भंग झाल्यास कारवाई करण्याचा इशारा, उद्याच्या नाशिक बंदच्या पार्श्वभूमीवर बजावली नोटस
5.20 PM - औरंगाबाद महानगरपालिका काकासाहेब शिंदेच्या नातेवाईकाला 10 लाख रुपये मदत देणार, औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय, तसेच मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याची शिफारस करणारा ठरावही मंजूर
3.45 PM - मराठा मोर्चा आयोजकांकडून उद्या मुंबई बंदचं आवाहन, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड बंद, उद्याच्या बंदमध्ये कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, तोडफोड होणार नाही, आयोजकांचं आश्वासन
2.40 PM - आंदोलनात पेड लोक हे चंद्रकांतदादांचं वक्तव्य आंदोलन चिघळण्यासाठीच, मतांच्या राजकारणासाठी भाजपची स्ट्रॅटेजी, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
2.20 PM लातूर शहरासह जिल्ह्यात बंदला प्रतिसाद पहायला मिळाला. मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर लातूरमध्ये बाजारपेठ उघडलीच नाही. एसटी बसेस खबरदारी म्हणून स्थानकातच थांबविण्यात आल्या, तर शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
2.15 PM; उस्मानाबादहून औरंगाबादच्या कायगावला आज जादा कुमक मागवली होती, त्यातील एका हवालदाराचा ह्रदयविकाराने मृत्यू
श्याम लक्ष्मण पाटगावकर असं पोलिसाचं नाव.
2.00 PM नाशिक - बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
"सरकारने विश्वासार्हता गमावली. सरकारने आरक्षण संदर्भात आर्थिक निकषाची चाचपणी करावी. मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगावं, आरक्षण कधी मिळणार ते. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने सोडवले तर राज्यातील सर्व आंदोलने संपतील", असं आमदार बच्चू कडू म्हणाले.
12.40 PM नालासोपारा :-
नालासोपाऱ्यात मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांचे निषेध आंदोलन सुरु झाले आहे. दंडाला काळी फीत बांधून शासनाचा निषेध करण्यात येत आहे.
काकासाहेब शिंदेंना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाज़ी करण्यात आली. नालासोपारा पूर्व रेल्वे पुलाखाली शेकडो मराठा कार्यकर्ते एकवटले होते. फडणवीस सरकार हाय हाय, आरक्षण आमच्या हक्काचे , अशा घोषणा देत आंदोलन सुरू आहे. आंदोलन शांततेत सुरू आहे.
12.30 PM कोल्हापुरात आंदोलन
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात झाली. ऐतिहासिक दसरा चौकात मराठा कार्यकर्ते दाखल झाले. आंदोलकांनी बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. शहर वगळता ग्रामीण भागात एसटीवर दगडफेक करण्यात आली. कोल्हापूर बंदला संमिश्र प्रतिसाद. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार. काँग्रेस आमदार सतेज पाटील, शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर, महापौर शोभा बोंद्रेसह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात.
12.20 PM - औरंगाबाद - कायगाव पुलाजवळ आंदोलकांनी फायर ब्रिगेडची गाडी पेटवली
12.15 PM नवी दिल्ली- राज्यसभेत संभाजीराजेंकडून मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित, मात्र मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाऊ न देणं कितपत योग्य? उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचा सवाल
11.56 AM बुलडाण्यात बस बंद, विद्यार्थ्यांना फटका
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदचे पडसाद बुलजाणा जिल्ह्यातही उमटत आहेत.अनुचित प्रकार घडू नये म्हणून आज सकाळपासूनच बुलडाणा –चिखली- मेहकर आगाराच्या बस सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या. मात्र बस बंद होण्यापूर्वी ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत पोहोचले होते. पण शाळेत गेल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून शाळाही बंद केल्याने, विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी वाहनच उपलब्ध झालं नाही. बुलडाणा जिल्ह्यात शेगाव खामगाव देऊळगाव राजासह संपूर्ण जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. जानेफळ येथे रस्ता रोको करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व व्यवहार ठप्प असून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
11.48 AM - औरंगाबाद - मराठा मोर्चा आंदोलकातील आणखी एका युवकाची नदीत उडी, कन्नड तालुक्यातील देवगांव रंगारी येथील घटना, गुड्डू सोनावणे गंभीर जखमी
11.36 AM - नांदेड: जिल्हयात एस टी बस सेवा आणि शैक्षणिक संस्था बंद. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. भाग्यनगर, आनंदनगर परिसरात बंदचे आवाहन करताना दुकानांवर दगडफेक. संपूर्ण जिल्हयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. काकांडी परिसरात एक बस फोडली. विष्णूपुरीत काही वेळ रास्ता रोको
11.34 AM
11.00 AM - औरंगाबाद- काकासाहेब शिंदेंच्या अंत्यसंस्काराला आलेल्या शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी, खैरेंना धक्काबुक्की करत घटनास्थळावरुन घालवलं
10.55 AM औरंगाबाद - कायगावात काकासाहेब शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार, लहान भाऊ अविनाश शिंदेंने अग्नी दिला.
10.30 AM नंदुरबार- शहादा शहरात कडकडीत बंद. कोणत्याही प्रकारची सूचना न देता बंद पुकारला. सुरु असलेली दुकाने बंद करण्यासाठी सकल मराठा मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर. दुपारी 1 वाजता महामार्गावर चक्का जाम करणार.
10.00AM नाशिकहून औरंगाबादला जाणारी बससेवा बंद, एस टी महामंडळचा निर्णय, येवलापर्यंतच बस जाणार, नाशिक -पंढरपूर बस संगमनेरजवळ अज्ञातांनी जाळण्याचा प्रयत्न केल्यानं खबरदारीचा उपाय, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर निर्णय
8.45 AM - मराठवाड्यात सर्व शाळांना सुट्टी
8.40 AM
मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.
मराठा मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांच्या मते, आज सकाळी सोलापूर, सातारा, नवी मुंबई, पालघरमध्ये मराठा क्रांती मोर्चाबाबत चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्र बंद बाबतचे मेसेज रात्री उशिरा मिळाल्याने, कोणकोणत्या जिल्ह्यात महाराष्ट्र बंद असेल, याबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
मुंबईबाबत आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन आम्ही भूमिका स्पष्ट करु.
रात्रीपासून पुणे ते औरंगाबाद एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. अन्यत्र एसटी बस सुरळीत आहेत.
दरम्यान, सरकारकडून काकासाहेब शिंदे यांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये आणि भावाला आठवडाभरात सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला या दोघांना निलंबित करण्यात आलं आहे.
काकासाहेब शिंदेंच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा संघटनांनी केली आहे.
राज्यात परळी, लातूर याठिकाणी पोलिस स्टेशनमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
8.15 AM काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मराठा आंदोलकांनी गंगापूर पोलीस स्टेशनसमोरचं ठिय्या आंदोलन मागे घेतलं आहे.
8.00 AM आज सकाळी 10 वाजता मृत आंदोलक काकासाहेब शिंदे याच्या पार्थिवावर कायगाव टोका इथं अंत्यविधी होणार आहेत.
8.00 AM मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन, औरंगाबाद - गंगापूर रस्ता बंद
औरंगाबाद - काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला दोघे निलंबित,शिंदेंच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर, शिंदेंच्या भावाला शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणार
मुंबई- महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज बैठक, मराठा मोर्चा समन्वयकांची शिवाजी मंदिर येथे दुपारी 2.30 वाजता बैठक.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने आपला आवाज बुलंद केला असून, गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाने आक्रमक रुप धारण केले आहे. दिवसभरात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली.
औरंगाबादमध्ये आंदोलकाचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका गावात एका मराठा आंदोलकानं गोदावरी नदीत उडी मारली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. काकासाहेब शिंदे असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव आहे. काकासाहेब शिंदे याला मच्छीमारांनी नदीपात्रातून बाहेर काढले. त्यानंतर गंगापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर गंगापूर पोलीस ठाण्यासमोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होत नाही, तोवर मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका मृत काकासाहेब शिंदेच्या भावानं घेतली आहे.
काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करुन त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत मेगाभरती रोखावी, स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी केल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
औरंगाबादमधील मराठा आंदोलनकर्त्याच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुख व्यक्त केलं आहे. शिवाय मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
मृत काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला सर्वोतपरी मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कुठलीही हिंसा किंवा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष करु नये : संभाजीराजे
औरंगाबादमधील मराठा आंदोलकाच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाजाच्या भावना किती तीव्र आहेत हे मी समजू शकतो, असे संभाजीराजे म्हणाले.
तसेच, संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना आवाहनही केले. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, कुठलाही वेळ न दवडता त्यांनी आंदोलकांशी तातडीने चर्चा करावी. केवळ टीव्हीमध्ये आपली बाजू न सांगता मराठा समाजाच्या सर्व घटकांना सर्व नेत्यांना एकत्र बोलावून त्यांच्याशी वन-टू-वन चर्चा करावी. यासंदर्भात सरकारी पातळीवर जे जे शक्य आहे ते करण्यासाठी तातडीने मिटिंग बोलवावी.”