मुंबई: एनडीएकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या नावाची आज (सोमवार) घोषणा करण्यात आली आहे. याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केली. एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यातबाबत ही चर्चा झाल्याची माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली.


‘अमित शाह यांनी राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांचं नाव उद्धव ठाकरेंना सांगितलं असून त्यासाठी पाठिंबा मागितला आहे. आपण याबाबत लवकरच पक्षाची बैठक घेऊ आणि त्याबाबतचा निर्णय आपल्याला दोन दिवसात कळवू. असं उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना सांगितलं’ अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

‘शिवसेनेकडून मोहन भागवत किंवा स्वामीनाथन यांची नावं सुचवण्यात आली होती. पण आता भाजपनं रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे याबाबत पक्षाच्या बैठकीत जे काही ठरेल ते शाह यांना कळविण्यात येईल.’ असंही संजय राऊत म्हणाले.
रामनाथ कोविंद 'एनडीए'चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार!

बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे भाजप प्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.

रामनाथ कोविंद हे दलित नेते म्हणून परिचीत आहेत. त्यांनी सामाजिक कार्य मोठं आहे. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर एनडीएचं एकमत झाल्याचं अमित शाह म्हणाले.

सध्या बिहारचे राज्यपाल असलेले रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवाशी आहेत.

“कोविंद यांच्या उमेदवारीबाबत आम्ही सर्वपक्षीयांशी संपर्क साधून कळवलं आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना फोन करुन याबाबतची माहिती दिली आहे. तसंच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनाही याबाबत सांगितल्याचं” अमित शाह म्हणाले.
संबंधित बातम्या:

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याबाबतच्या 10 खास गोष्टी

रामनाथ कोविंद 'एनडीए'चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार!