मुंबई: युतीसाठी हात पुढे करणाऱ्या मनसेने शिवसेनेला आता आणखी एक विनंती केली आहे. मनसेची उद्याची शेवटची प्रचारसभा दादरमधील दत्ता राऊळ मैदानावर होऊ द्यावी, अशी विनंती मनसेने शिवसेनेकडे केली आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना नेते सदा सरवणकर यांना विनंती केली.

शिवसेनेने दत्ता राऊळ मैदान बूक केल्यामुळे मनसेला उद्याची सभा दादरमधील कबुतरखान्याजवळ घ्यावी लागणार आहे. मात्र त्याऐवजी राऊळ मैदान मिळावं, अशी मनसेची विनंती आहे.

काय आहे प्रकरण?

दादरमधील दत्ता राऊळ मैदान हे शिवसेनेने आधीच बूक केलं आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्याची शेवटची सभा बीकेसीमधल्या एमएमआरडीए मैदानावर आहे. मग असं असताना शिवसेनेला दोन्ही मैदानं कशासाठी असा सवाल करत, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर आक्षेप घेतला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होऊ नये, यासाठी शिवसेनेनं दादरमधलं दत्ता राऊळ मैदान अडवून ठेवल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला.

शिवसेनेचा दावा

मात्र शिवसेनेने हे मैदान दोन-चार दिवसात नव्हे तर खूप आधीच बूक केलं आहे. त्यामुळे कधीही झोपेतून उठून मैदान मागणाऱ्यांना का देऊ, अशी भूमिका शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी घेतली.

तसंच उद्धव ठाकरेंची सभा बीकेसी मैदानावर असली, तरी दत्ता राऊळ मैदानावर शिवसेनेचे इतर नेते सभा घेणार असून, ते मैदान आपण आधीच आरक्षित केल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे.

संबंधित बातम्या

राज ठाकरेंच्या दादरमधील सभेचं ठिकाण ठरलं!

दादर मैदानावरुन शिवसेना-मनसे आमने-सामने


फडणवीस सरकारची डेडलाईन शिवसैनिक ठरवतील : आदित्य ठाकरे

‘सामना’वर बंदी घालू देणार नाही : व्यंकय्या नायडू