मुंबई : आपल्या परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकवेळा अडचणीत आले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल झालीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) तुलना तालिबानशी केलेल्या कथित वादग्रस्त विधानावरून ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (वय 76) यांच्याविरोधात आणखीन एका वकिलाने मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी फिर्याद दाखल केली आहे.


तालिबानमधील सत्तांतरानंतर जगभरात त्याचे प्रतिसाद आणि प्रतिक्रिया उमटत असताना अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला यासंदर्भात मत व्यक्त करताना आरएसएसचा उल्लेख करत तालिबानची तुलना आरएसएसबरोबर केली. संघाची विचारसरणी तालिबानींसारखी आहे, आरएसएस लोकांची दिशाभूल करते, त्यांचे मानसिक खच्चीकरण असल्याचंही अख्तर यांनी म्हटलं होतं. यामुळे संघाची प्रतिमा जनमानसात मलीन झाली असल्याचा आरोप करत आरएसएस समर्थक ॲड. संतोष दुबे यांनी मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात अख्तर यांच्याविरोधात कलम 499 (मानहानी), 500 (बदनामी अंतर्गत शिक्षा) फौजदारी तक्रार दाखल केली आहे. अख्तर यांनी राजकीय हेतूने आरएसएसच्या नावाचा अनावश्यकपणे वापर केला असल्याचंही दुबे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेलं आहे.  


मुंबई, ठाण्यापाठोपाठ आता मुलूंड कोर्टातही याचिका
आरएसएस आणि तालिबान्यांची विचारधारा, तत्त्वज्ञान, मानसिकता आणि कार्यपद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारे साम्य नाही. परंतु, आरएसएसची प्रतिष्ठा खराब करणे, नुकसान हेतूने, हेतुपुरस्सर बदनामीकारक काल्पनिक विधाने केली असल्याचेही दुबे यांनी म्हटलेलं आहे. ठाणे कोर्टानं अश्याच एका प्रकरणात जावेद अख्तर यांना 12 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिलेत. राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यकर्ता विवेक चंपानेरकर यांनी हा दावा दाखल करत अख्तर यांच्याकडनं एक रूपया मानहानीवसूल करण्याची मागणी केली आहे. तर मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयातही एका वकिलाने अख्तर यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. यामुळे अख्तर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.