मुंबई : मोनोरेलला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. मात्र या आगीमुळे मोनोरेलच्या दोन डब्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
चेंबुरच्या दिशेने जाणाऱ्या मोनोरेलच्या मागच्या डब्यांना वडाळ्याजवळ म्हैसूर कॉलनी स्टेशन इथे आज (गुरुवार) पहाटे 5.20च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. सुदैवाने ही मोनोरेल रिकामी असल्याने मोठी दुर्घटना टळली.
आगीची माहिती मिळताच मोनोरेल प्रशासनाने तातडीने पावलं उचलली आणि याची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच ही आग आटोक्यात आणली.
दरम्यान, या आगीत मोनोरेलच्या दोन डब्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. तसंच सध्या मोनोरेलची वाहतूकही ठप्प आहे. काही वेळात मोनोरेलची सेवा सुरु होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येतं आहे.
मात्र मोनोरेलचे वारंवार होणारे अपघात, खोळंबे हे कधी थांबणार? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.