मुंबई : महाराष्ट्र सरकारने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडून गर्दी न करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. सरकारने या संदर्भात सर्कुलर जारी करुन घरातच राहून नववर्षाचं स्वागत करावं. समुद्रकिनारे, उद्याने तसंच रस्त्यावर जाऊ नये असं म्हटलं आहे. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आधीपासूनच नाईट कर्फ्यू जारी आहे.
सर्कुलरमध्ये विशेषत: दहा वर्षांखालील मुलं आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वृद्धांनी कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव, गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव, वरळी आणि जुहू इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात.
नववर्षासाठी महाराष्ट्र सरकारची नियमावली
- कोरोनाची परिस्थिती पाहता आवाहन आहे की, नव्या वर्षाचं स्वागत घरातच करावं.
- 31 डिसेंबरला नागरिकांनी समुद्रकिनारे, उद्याने विशेषत: मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी सोबतच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये
- सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. सोबतच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.
- विशेषत: वयोवृद्ध (60 वर्ष) आणि मुलांनी (10 वर्ष) घराबाहेर पडणं टाळावं.
- 31 डिसेंबरला कोणत्याही धार्मिक अथवा सांकृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.
- नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक स्थळी भाविकांची मोठी गर्दी होते. यंदा गर्दी टाळा
- नववर्षाच्या स्वागतासाठी यंदा आतषबाजी टाळा, नियमांचं सक्तीने पालन करा
- नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर कारवाई करतील.
- नाईट कर्फ्यू रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत जारी असेल.
दरम्यान, 31 डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब्ज रात्री 11 वाजेपर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी आहे. 11 वाजल्यानंतर हॉटेल्स, रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.