नवी मुंबई : ठाणे-पुणे मार्गावर खड्डे पाहिल्यानंतर कुणालाही प्रश्न पडावा, या रस्त्यात खड्डे आहेत की हा रस्ताच खड्ड्यात आहे? या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे.


विशेष म्हणजे हा रस्ता 50 ते 60 वर्षे जुना आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा मार्ग आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे रस्ता आस्तित्त्वात राहिलेला नाही.



तुर्भे ते सानपाडा दरम्यान अर्धा किलोमीटरचा पट्टा नवी मुंबई महानगरपालिकेकडे नसल्याने पालिका लक्ष देत नाही, तर सायन-पनवेल मार्गाचे रुंदीकरण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची डागडुजी केलेली नाही. त्यामुळे दुर्लक्षित आणि बेवारस अशी या रस्त्याची अवस्था झाली आहे.



रस्त्यावर 8 ते 10 फूट लांबीचे आणि 1 ते दीड फूट खोल खड्डे असल्याने गाड्या पूर्ण खड्ड्यांमध्ये धडकून अनेक अपघात होत आहेत. गाड्यांचे मोठे नुकसान होत आहे. खड्ड्यांमुळे नेहमीच या मार्गावर 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. एवढे होत असूनही सार्वजनिक विभाग ढिम्म बसलं आहे. रस्त्याचे काम करताना दिसत नाही. यामुळे वाहन चालकांकडून आणि लोकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे.