मुंबई: जगातील तमाम गणेशभक्तांच्या आकर्षणाचा विषय असलेला लालबागचा राजाची मिरवणूक तब्बल 19 तासांनी गिरगाव चौपाटीच्या परिसरात दाखल झाली आहे. लालबागचा राजा (Lalbaugcha Raja Visarjan 2024) मंगळवारी सकाळी साधारण 11 वाजता मंडपातून विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला होता. त्यानंतर लालबागचा राजा हा लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग,चिंचपोकळी पूल, बकरी अड्डा, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, कुंभारवाडा,सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी.टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस अशा प्रवास करुन गिरगाव चौपाटीवर दाखल होतो. यंदा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला हे अंतर पार करण्यास तब्बल 20 तास लागले.


काहीवेळापूर्वीच लालबागचा राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर दाखल झाली आहे. आता गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजाची आरती केली जाईल. या आरतीसाठीही गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची मोठी गर्दी असते. ही आरती संपन्न झाल्यानंतर लालबागचा राजाला तराफ्यावर ठेवून खोल समुद्रात त्याचे विसर्जन केले  जाईल. येथील कोळी बांधवांच्या अनेक होड्या लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी समुद्रात जातात. लालबागचा राजाला निरोप देताना कार्यकर्ते आणि गणेशभक्त भावूक होताना दिसतात. 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी तराफ्यावर बसतो तेव्हा भक्तांच्या मनात कालवाकालव होताना दिसते. त्यामुळे गिरगाव चौपाटीवरील आता राजाला साश्रू नयनांनी निरोप दिला जाईल. 


गेल्या 10 दिवसांमध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि बॉलीवूड तारे-तारकांनी लालबागचा राजाच्या मंडपात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले होते. लालबागचा राजाच्या चरणस्पर्श, नवसाची आणि मुखदर्शनाच्या रांगेतही यंदा नेहमीप्रमाणे मोठी गर्दी होती. यंदा अंबानी कुटुंबीयांनी लालबागचा राजाला दिलेला सोन्याचा 20 किलोचा मुकूट अर्णण केला होता. यानंतर अनंत अंबानी पाचवेळा लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते. याशिवाय, आज पहाटेही अनंत अंबानी यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले होते.


चिंचपोकळीचा चिंतामणी गिरगाव चौपाटीवर


लालबागचा राजाच्या पाठोपाठ चिंचपोकळीचा चिंतामणी सार्वजनिक मंडळाचा गणपतीही गिरगाव  चौपाटीवर दाखल झाला आहे. काल रात्री 11 वाजता समुद्राला भरती आली होती. त्यामुळे गणेश मंडळांना काही काळ गणेशमूर्तींचे विसर्जन करता आले नव्हते. त्यामुळे अनेक गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन अद्याप बाकी आहे. लाडक्या बाप्पााला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर अजूनही भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. लालबागचा राजाचे विसर्जन हादेखील गणेशभक्तांच्यादृष्टीने आकर्षणाचा विषय असतो. 



आणखी वाचा


पुण्यात विसर्जन मिरवणूक रखडली; मंडई , शारदा गणपती, भाऊसाहेब रंगारी मंडळाचं विसर्जन बाकी