मुंबई : लालबागच्या राजाच्या चरणी यंदाही भक्तांनी भरभरून दान दिले आहे. गणेशोत्सवादरम्यान भक्तांनी लालबागच्या राजाचरणी रोख रक्कम आणि सोन्या-चांदीच्या अनेक वस्तू अर्पण केल्या आहेत. यामध्ये 4 किलो 286 ग्रॅम इतक्या वजनाचे सोन्याचे दागिने तर दुसरीकडे 80 किलो 300 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू दान स्वरुपात देण्यात आल्या आहेत. दागिन्यांसह 6 कोटी 5 लाख रुपये इतकी रोख रक्कम दान स्वरूपात जमा झाली असून पैशांची मोजणी अद्याप सुरु आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मिळालेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा आज लिलाव करण्यात आला. हा लिलाव दोन दिवस सुरू असतो. दरवर्षी लिलावाला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. परंतु यंदा लिलावाला मंदीचा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले.