मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीवर हायकोर्टानं पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली आहे. केवळ दुसऱ्या यंत्रणांनी केलेल्या तपासावर विसंबून राहू नका, तुमच्या कामात निदान थोडीतरी प्रगती दाखवा. अशा शब्दांत हायकोर्टानं या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांना समज दिली आहे. कोल्हापुरात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे गेल्या दिड महिन्यात याप्रकरणात फारसं काम करता आलं नाही, कारण या टीमलाही बचावकार्याचं काम करावं लागलं होतं. मात्र तरिही दाभोलकर आणि कलबुर्गी प्रकरणांतील आरोपींचा ताबा मिळवून त्यांच्याकडून पानसरे हत्याकांडामागील सूत्रधारांची काही माहिती मिळतेय का? याचा तपास सुरू असल्याचं विशेष सरकारी वकीलांनी हायकोर्टाला सांगितले.


डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी वापरलेलं हत्यार खाडीपात्रातून शोधण्यासाठी किमान चार आठवड्यांचा अवधी आवश्यक आहे, अशी माहिती सीबीआयनं हायकोर्टात दिली. दाभोलकर यांच्या हत्येकरीता वापरण्यात आलेल्या पिस्तुलाचे अवशेष आरोपींनी कळव्याच्या खाडित टाकल्याची माहिती आहे. हे पिस्तुल शोधण्यासाठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या असून परदेशातील प्रशिक्षित डायव्हर्सची या कामात मदत घेतली जाणार आहे. अशी माहिती सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात दिली.

कोल्हापूर येथे फेब्रुवारी 2015 मध्ये कॉ. गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती तर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचाही अज्ञात मारेकऱ्यांनी ऑगस्ट 2023 साली खून केला होता. याप्रकरणी दाभोलकर - पानसरे कुटुंबियांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.