कल्याण : कल्याणमध्ये विवाहितेची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.
सनम करोतिया नावाच्या विवाहित महिलेवर चाकू हल्ला करण्यात आला. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली, तरी हत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
सनम करोतिया दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये स्कूटरवरून आल्या. त्या दुचाकी लावत असतानाच त्यांच्या मागे बाईकवरुन दोघं जण आले. त्यापैकी दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने उतरुन सनम यांच्यावर वार केले आणि पळ काढला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सनम यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. तासाभरातच सनम करोतिया यांच्यावर चाकूने हल्ला करणारा आरोपी बाबू ढकणी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा हल्ला नेमका का करण्यात आला, हे अजूनही समोर आलेलं नसून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कल्याणच्या APMC मार्केटमध्ये विवाहितेची चाकूने भोसकून हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jul 2019 11:14 PM (IST)
सनम करोतिया या विवाहितेची चाकू हल्ला करुन हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अटक केली असली, तरी हत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -