मुंबई : जगातील पहिल्या लेडीस स्पेशल लोकल ट्रेनला आज 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 5 मे 1992 रोजी पहिली लेडीज स्पेशल लोकल ट्रेन पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते बोरिवली दरम्यान धावली. तेव्हापासून आजपर्यंत पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील लेडीज स्पेशल ट्रेनला महिलांचा वाढता प्रतिसाद दिसून येत आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर आठ लेडीज स्पेशल ट्रेन धावत आहेत.
1990 च्या दशकात दक्षिण मुंबईचा झपाट्याने विकास झाला. मुंबईतील औद्यागिकीकरण आणि व्यवसायाच्या वाढीमुळे उपनगरातून मुंबईत रोजगारासाठी येणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे मुंबईत महिलांसाठी लोकल सेवेत विशेष प्राधान्य असावे, अशी मागणी जोर धरत होती. याचा मुंबई उपनगरीय रेल्वेने विचार करुन महिलांसाठी 5 मे 1992 पासून महिलांसाठी विशेष लोकल सेवा सुरु केली.
सुरुवातीच्या काळात ही सेवा पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते बोरीवली पर्यंत सुरु झाली. पण मुंबईचा वाढती लोकसंख्या पाहून 1993 मध्ये याचा विस्तार करुन विरारपर्यंत ही सेवा सुरु करण्यात आली. यानंतर कालांतराने ही सेवा मध्य रेल्वे मार्गावरही सुरु करण्यात आली.
महिलांसाठीच्या या विशेष लोकलमुळे मुंबईत कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांची मोठी सोय झाली. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसाला महिलांसाठी लोकलच्या आठ फेऱ्या चालवल्या जातात.
महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी पश्चिम रेल्वेने 60 कोचच्या ट्रेनमध्ये सीसीटीव्ही बसवले आहेत. तसेच महिला सुरक्षेसाठी ट्रेनमध्ये प्रायोगिक तत्वावर टॉक बँक सिस्टीमही बसवली आहे. ज्या माध्यमातून संकटाच्या वेळी महिला रेल्वे प्रवासी, गाडीचे गार्ड यांच्याशी संपर्क करु शकेल.