मुंबई: भरधाव बेस्ट बसखाली चिरडून मुंबईतील कुर्ला परिसरात 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. कुर्ला येथील एलबीएस मार्गावर सोमवारी रात्री हा भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेनंतर संतप्त जमावाने बेस्टचालक संजय मोरे याला मारहाण केली होती. मात्र, काही स्थानिकांनी आणि पोलिसांनी संजय मोरे याला जमावाच्या तावडीतून सोडवले होते. संजय मोरे याला न्यायालयाने 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता त्याच्या चौकशीत एक नवीन माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर बेस्ट प्रशासनाने संजय मोरे याला इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी 10 दिवसांचे रितसर प्रशिक्षण देण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, पोलिसांच्या चौकशीत संजय मोरे याने वेगळीच माहिती दिली.
माझ्या प्रशिक्षणाचा कालावधी 3 दिवसांचा होता. त्यापैकी पहिले दोन दिवस मला संगणकावर इलेक्ट्रिक बसच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मला फक्त एकच दिवस इलेक्ट्रिक बस चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. अपघाताच्या दिवशी बस कशी अनियंत्रित झाली, मला माहिती नाही. मी गेल्या 30 वर्षांपासून बस चालवत आहे. या काळात माझ्याबाबत कोणीही तक्रार केलेली नाही. कोणताही अपघात माझ्या हातून झालेला नाही. बस अनियंत्रित कशी झाली, नेमके काय झाले, इलेक्ट्रिक बसमध्ये काही बिघाड होता का, याबाबत संजय मोरे यांना नेमकेपणाने काहीच सांगता आले नाही. त्यामुळे आता पोलिसांनी बेस्ट प्रशासन आणि आरटीओकडून इलेक्ट्रिक बसबाबत अहवाल मागवला आहे. प्राथमिक तपासणीत आरटीओ आणि बेस्ट प्रशासनाने इलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड आढळून आला नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता नेमकी चूक कोणाची, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
संजय मोरे याला 1 डिसेंबरपासून इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी देण्यात आली होती. तो कुर्ला ते अंधेरी या मार्गावर इलेक्ट्रिक बस चालवायचा. सोमवारी अपघाताच्या दिवशी संजय मोरे यांनी दुपारी अडीच वाजता ड्युटी सुरु केली. चार वाजता ते इलेक्ट्रिक बस घेऊन पहिल्या फेरीसाठी बाहेर पडले. दोन फेऱ्या व्यवस्थित पार पडल्यानंतर त्यांच्या ड्युटीचे 6 तास पूर्ण झाले होते. त्यामुळे त्यांना साकीनाकापर्यंत फेरी मारण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते कुर्ला आगारातून बस घेऊन बाहेर पडतात एलबीएस रोडवर बस अनियंत्रित होऊन अपघात घडला.
कुटुंबीयांकडून संजय मोरेंची पाठराखण
संजय मोरे हे नेहमी काम संपवून रात्री 11 वाजेपर्यंत घरी येतात. मात्र, अपघाताच्या दिवशी ते नेहमीच्या वेळेला घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांना फोन केले. मात्र, त्यावेळी संजय मोरे पोलिसांच्या ताब्यात होते. अखेर रात्री उशिरा एका पोलिसाने संजय मोरे यांच्या मुलाला फोन करुन माहिती दिली. मोरे यांच्या कुटुंबीयांनी त्यांची पाठराखण केली आहे. मोरे यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. त्यांच्याकडून वाहन चालवण्यात हलगर्जीपणा होऊ शकत नाही. ते 1989 पासून वाहन चालवत आहेत. त्यांच्याकडून चूक होऊ शकत नाही, असा दावा संजय मोरे यांच्या नातेवाईक आणि कुटुंबीयांनी केला.
आणखी वाचा