मुंबई : महानगरपालिकेच्या नव्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या महापौर दालनात केलेले काही बदल सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. अनेकजण घर किंवा नवी वास्तू घेताना वास्तूशास्त्राच्या नियमांचीही पडताळणी करतात. महापौर किशोरी पेडणेकर यांनीही महापालिकेतल्या महापौर दालनात वास्तूशास्त्राला अनुसरुन काही बदल केले असल्याचे बोलले जात आहे. मात्र, हे बदल दिशांसाठी नाही तर मुंबईकरांची दशा बदलण्यासाठी केले असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.


महापौर दालनात काय बदल केले आहेत?
1. महापौरांनी आपल्या दालनाच्या जुन्या प्रवेशद्वारातून प्रवेश बंद करून बाजूच्या दरवाजाचा वापर सुरु केला आहे. दालनातील आसन व्यवस्थेतही बदल केले आहेत.
2. सध्याचा दालनाचा मुख्य दरवाजा बंद करुन त्याच्या बाजूचा दरवाजा उघडण्याचेही आदेश दिले आहेत.
3. उत्तर दिशेला तोंड करुन महापौरांचे आसन ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दरवाजातून दालनात गेल्यानंतर डाव्या हाताला महापौरांकडे जावे लागते.
4. दालनातील डाव्या बाजूला असलेले मिटींग टेबल उजव्या बाजूला ठेवण्यात आले आहे.
5. महापौर दालनातील तीन मोठ्या खिडक्या उघडण्यात आल्या आहेत.
6. आसनव्यवस्थेसह दालनाबाहेरील महापौरांच्या नावाचा साधा नामफलक बदलून तेथे डिजिटल फलक लावण्यात आला आहे.
7. पालिकेच्या हेरिटेज इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर पालिका सभागृहाला लागूनच महपौरांचे दालन आहे. पूर्वी या दालनाच्या शेजारी पालिका चिटणीसांचेही दालन होते. कालांतरांने चिटणीसांना अन्य दालन उपलब्ध करुन देत महापौरांचे दालन भव्य करण्यात आले.
8. 1999 मध्ये हरेश्वर पाटील महापौर असताना महापौरांची खुर्ची दालनात गेल्यानंतर डाव्या हाताला होती. ही व्यवस्था पुढील काही काळ तशीच ठेवण्यात आली होती.
9. श्रद्धा जाधव यांच्या महापौरपदाच्या काळात सन 2009 मध्ये ही आसनव्यवस्था बदलली आणि दरवाजातून आत शिरल्यानंतर समोरच महापौरांची खुर्ची होती. विश्वनाथ महाडेश्वर महापौर होईपर्यंत ही आसनव्यवस्था तशीच होती.
10. किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती होताच त्यांनी खुर्ची व इतर आसनव्यवस्था बदलण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.

या बदलांबाबत एबीपी माझाने महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी बातचित केली. यावेळी पेडणेकर म्हणाल्या की, महापौर दालनातील बदल हे वास्तूशास्त्रांप्रमाणे नाहीत तर हवा आणि प्रकाश खेळता राहण्यासाठी केले आहेत. तसेच वीजबचत हादेखील त्यामागचा एक उद्देश आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, महापौर दालनाची बैठकव्यवस्था वास्तूशास्त्राच्या नियमांप्रमाणे केली या चर्चा चूकीच्या आहेत. नव्या बैठकव्यवस्थेमुळे खिडक्या उघड्या ठेवता येतात. पंखा, दिवे लावण्याची आवश्यकता भासत नाही. एसीशिवाय दालनातील वातावरण थंड राहते. यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.

पेडणेकर म्हणाल्या की, वास्तूशास्त्राचे नियम पाळायचे असते तर महापौरांच्या खुर्चीचे तोंड पूर्व दिशेकडे करणे गरजेचे होते. आम्ही तसे केलेले नाही. महापौर निवास्थानातही असे बदल करता आले असते. मी दिशा नाही भेटायला येणाऱ्या माणसांची दशा पारखते, म्हणून हे बदल केले आहेत.

महापौर दालनाविषयी अधिक माहिती
1. आधीच्या महापौरांची खूर्ची दक्षिणमुखी असायची आता ती उत्तरमुखी करण्यात आली आहे. मात्र, महापौर दालनाचे प्रवेशद्वार दक्षिणमुखीच आहे.
2. आतापर्यंत सुनिल प्रभू, श्रद्धा जाधव, स्नेहल आंबेकर या महापौरांनीदेखील दालनातील रचना बदललेली आहे.
3. दालनात कोणीही नसतानादेखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि अन्य बाबींसाठी दिवे लावले जायचे.
4. आता महापौर दालनातील मोठ्या तीन खिडक्या उघडल्याने पुरेसा प्रकाश असतो.
5. महापालिकेची वास्तू हेरिटेज आहे. त्यामुळे पुरेसा प्रकाश आणि हवा खेळती नसेल तर सागवानी लाकडाचे साहित्य, जूनी झुंबरे खराब होण्याची शक्यता असते.