मुंबई : कांद्याच्या दराने शंभरी गाठल्याने ग्राहकांचं बजेट कोलमडलं आहे. कांद्याचे दर गेल्या काही दिवसांपासून वधारले असल्याने कांद्याला सोन्याचा भाव आला आहे. कांद्याची किंमत पाहून तर आता चोरांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळवला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील डोंगरी परिसरात कांदा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र ही चोरी करणं दोन चोरट्यांना महागात पडलं आहे. त्यामुळे व्यापारी आणि दुकानदार आपल्याकडे असलेला कांदा सुरक्षित ठेवण्याकडे लक्ष देताना दिसत आहेत.


मुंबईतील डोंगरी जेल रोड परिसरात कांद्याच्या दोन गोण्या चोरी करणाऱ्या चोरांना ही चोरी चांगलीच महागात पडली आहे. चोरीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 6 डिसेंबरच्या रात्री हा प्रकार घडला आहे. या परिसरात रहमत शेख आपला मुलाग अकबर शेक सोबत छोटं भाजीचं दुकान चालवतात. नेहमीप्रमाणे रहमत शेख दिवस अखेर दुकान बंद करुन घरी निघून गेले. चोरांनी त्यांच्या दुकानातील कांद्यांच्या गोण्यांवर नजर ठेवली होती. कांद्याची चोरी होऊ शकेल यांची किंचितही कल्पना नसल्याने त्यांनी कांद्यांच्या गोण्या दुकानातच ठेवल्या आणि तिथेच त्यांची चूक झाली.


चोरांनी त्याच रात्री संधी साधून त्यांच्या दुकानात ठेवलेल्या कांद्याच्या दोन गोण्या लंपास केल्या. रस्त्यालगत असलेल्या रहमत यांच्या दुकानात 22 कांद्याच्या गोण्या होत्या. त्यापैकी दोन कांद्याच्या गोण्या (112 किलो) चोरांनी चोरी केल्या. चोरीला गेलेल्या या कांद्याची किंमत बाजारभावानुसार 13 हजार 440 रुपये आहे. यावेळी चोरांनी शेजारील दुकानांतील 56 किलो कांदाही चोरला. त्यामुळे दोन्ही मिळून 21 हजार 160 रुपयांचा कांदा चोरीला गेला.


चोरीच्या घटनेनंतर रहमत शेख यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारावर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे डोंगरी पोलिसांनी चोरांचा शोध घेतला आणि दोन्ही चोरांना अटक केली आहे.



कांद्याच्या दरात घसरण


महिनाभरापासून दराची शंभरी गाठणारे कांद्याचे दर 40 टक्क्यांनी घसरले आहेत. 100 ते 120 रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा 60 रुपयांवर आला आहे. नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण बघायला मिळाली. मंगळवारी एपीएमसी बाजारपेठेत 136 गाड्यांची आवक झाली. चांगला दर मिळत शेतातून शेतकऱ्यांनी कांदा काढायला सुरुवात केली. त्यामुळे कांद्याच्या आवक वाढली आहे. कांद्याच्या दर कमी झाल्यानं सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला.