मुंबईत मोदींच्या सभेनंतरही विजय शिवसेनेचाच : उद्धव ठाकरे
एबीपी माझा वेब टीम | 07 Feb 2017 08:15 AM (IST)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेची वाट पाहत आहे. त्यांच्या सभेनंतरही शिवसेनेचाच विजय होईल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांदिवलीतील सभेत व्यक्त केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. चांदिवलीतील प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधत चौफेर फटकेबाजी केली. "मुंबईत मोदींची सभा झाली पाहिजे, याची मी वाट पाहतोय. ती सभा झाल्यानंतरही शिवसेना कशी विजयी होते, हे सगळ्यांना दाखवायला खूप मज्जा येईल," असं उद्धव ठाकरे म्हणाले. "मोदी मुंबईत येऊ शकतील. कारण इथे एखाद्या कमिटीची मीटिंग झाली तरी ते येतात," असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबईकरांना शिवसेना पाहिजे, भाडोत्री माणसं नको : उद्धव ठाकरे मुंबईत प्रचारासाठी येणार कोण आणि मदतीला धावून जाणार कोण, हे जनतेला माहित आहे. अस्सल मुंबईकरांना मुंबईत फक्त शिवसेनाच हवी, भाडोत्री माणसे नकोत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला. अस्सल मुंबईकराला शिवसेनाच हवी आहे. मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच आहे, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.