मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे खरेदी आदेश काढून कंत्राटदाराची कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या रेल्वेच्या पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यात रेल्वेच्या सेक्शन इंजिनीअरचाही समावेश आहे. मुंबई क्राईम ब्रान्चच्या युनिट 11 ही कारवाई केली आहे. महत्त्वाचं म्हणजे कागदोपत्री दाखवलेला माल प्रत्यक्षात अस्तित्त्वातच नव्हता.


किरण पुरुषोत्तम चौहान, मयुर विनोद सोळंकी, सुभाष रमण सोळंकी, स्वप्नील हेमंत गोसावी आणि अनिलकुमार अहिवार अशी अटक केलेला पाच आरोपींची नाव आहेत. अनिलकुमार मखनलाल अहिवार (वय 52 वर्षे) असं या सेक्शन इंजिनीअरचं नाव आहे. तो रेल्वेच्या महालक्ष्मी कारखान्यात वरिष्ठ अधिकारी आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या तीन आरोपींनी रेल्वेच्या दोन डब्यांना लिंक करण्याकरता लागणाऱ्या पाईपची रितसर ॲार्डर मिळवून देतो असं कंत्राटदाराला सांगितलं. आरोपींनी पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी विभागात सीनियर सेक्शन ॲाफिसर म्हणून कार्यरत असलेल्या अनिलकुमार अहिवार याच्या सहाय्याने हा कट रचला होता.


अनिलकुमार अहिवारच्या मदतीने आरोपींनी कंत्राटदाराला अजनी, नागपूर आणि भुसावळ येथे बोलावून कोणताही माल न दाखवता रेल्वे अधिकाऱ्याच्या मदतीने काम मिळाल्याचे खोटे खरेदी आदेश काढून सह्या घेतल्या. यासाठी भारतीय रेल्वेचा बनावट लोगो, वॉटरमार्क, स्टॅम्प असलेले कागदपत्रांचा वापर केला. पण टेंडर निघत नाही हे समजल्यावर आपली जवळपास तीन कोटी रुपयांना फसवणूक झाल्याचं कंत्राटदाराच्या लक्षात आलं. यानंतर त्याने पोलिसात धाव घेतली.



मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली होती. तर रेल्वे सेक्शन इंजिनिअर अनिल अहिरराव याला आज ग्वाल्हेरमधून अटक करण्यात आली. या टोळक्याने अशाच प्रकारे अनेकांना कोट्यावधी रुपयाचा गंडा घातला असून यामध्ये आणखी रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे.