मुंबई : किकी चॅलेन्जचं वेड आता लोकलच्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचलं आहे. मुंबई लोकलच्या दरवाजातून उतरुन एका तरुणानं प्लॅटफॉर्मवर डान्स केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. धावत्या लोकलमध्ये केलेलं किकी चॅलेन्ज या तरुणाच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. कारण आता या तरुणाचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.


चालत्या लोकलबाहेर प्लॅटफॉर्मवर डान्स करणारा हा तरुण दिसल्यास कळवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला आहे. 30 जुलैला युट्यूबवर हा व्हिडीओ अपलोड झाला आहे. या तरुणानं चालत्या लोकलबाहेर डान्स केला असला तरी इतरांनी असा मुर्खपणा करु नये, असं आवाहन रेल्वे पोलिसांनी केलं आहे.


काय आहे किकी चॅलेंज?
'किकी, डू यू लव्ह मी? आर यू रायडिंग?' असे ड्रेक- इन माय फीलिंग या 'किकी' गाण्याचे शब्द आहेत. चालत्या गाडीतून उडी मारायची आणि चालत असलेल्या गाडीच्याच वेगाने गाण्यावर नाचत चालायचं, असं या चॅलेंजचं स्वरुप आहे. सोशल मीडियावर सध्या 'किकी चॅलेंज' चांगलंच ट्रेण्डिंगमध्ये आहे.


हा धोकादायक चॅलेंज फॉलो करताना तु्म्ही स्वतःचा जीव तर धोक्यात टाकताच पण इतरांच्या जीवाशीही खेळता. त्यामुळेच जाणकारांनी या चॅलेंजच्या नादी न लागण्याचं आवाहन तरुणांना केलं आहे. आतापर्यंत जगभरातील अनेक तरुण किकी चॅलेंज करताना अपघातग्रस्त झाले आहेत.