नवी मुंबई : खारघरमधील रिक्षाचालकांचं आंदोलन 20 व्या दिवशी मागे घेण्यात आलं आहे. खारघर एकता रिक्षा युनियनने संप मागे घेत असल्याची घोषणा केली. आंदोलन मागे खारघरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.


21 नोव्हेंबर रोजी हद्दीच्या वादातून खारघर रेल्वे स्थानकावर रिक्षाचालकांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी सात रिक्षाचालकांना अटक करण्यात आली होती. यानंतर खारघरमधल्या 800 रिक्षाचालकांनी बंद पुकारला होता.

तळोजा रिक्षाचालकांनी दगडफेक करुन मारहाण केली असतानाही खारघर रिक्षाचालकांना अटक केली, असा आरोप खारघरमधील रिक्षाचालकांनी केला होता.

रिक्षाचालकांच्या संपामुळे खारघरमधील रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. पण 28 नोव्हेंबर रोजी संप मागे घेत असल्याची घोषणा रिक्षा युनियनने केली होती. पण दुसऱ्या दिवशी संघटनांनी मुजोरी कायम ठेवत, संप सुरुच ठेवला होता.

त्यामुळे वाहतूक शाखेनं रिक्षाचालकांच्या मुजोरीविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. आंदोलन मागे न घेतल्यास, रिक्षाचालकांचे परवाने रद्द करण्याचा इशारा पनवेल वाहतूक शाखेने दिला होता.

त्यासाठी पनवेल आरटीओने विनापरवाना रिक्षा, ड्रेसकोड नाही असे रिक्षाचालक, मीटरप्रमाणं भाडं न आकारणाऱ्या रिक्षाचालकांसह, ज्या रिक्षा संपात सहभागी झाल्यात अशा सर्वांना परवाने रद्द करण्याच्या नोटिसाही बजावल्या होत्या.

आरटीओच्या कठोर भूमिकेनंतर रिक्षाचालक संघटनांनी सावध पवित्रा घेत, आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. आज दुपारी 3 वाजल्यापासून रिक्षा पुन्हा सुरु होतील, अशी माहिती खारघर एकता रिक्षा युनियनच्या वतीने देण्यात आली.

संबंधित बातम्या


नवी मुंबईतील खारघरमधल्या रिक्षाचालकांचा बंद अखेर मागे


खारघरचा वाली कोण? आठवड्यापासून रिक्षा बंद, प्रवाशांचे हाल