Khalistan Terrorist In Maharashtra : महाराष्ट्रात घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी  सुरू केला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या हाती लागली आहे. खलिस्तानवादी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदाशी संबंधित धक्कादायक बाबी समोर आल्या आहे. हरियाणातील कर्नाल येथे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS) ताबा घेणार असल्याची माहिती आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड, मनमाड आणि नवी मुंबईवर सुरक्षा यंत्रणांची खास नजर आहे. या तीन भागांमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांचे स्लीपर सेल सक्रिय झाले आहेत. या स्लीपर सेलच्या माध्यमातून सामान्य लोकांमध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड ते पंजाब दरम्यानच्या अनेक भागांमध्ये खलिस्तानवाद्यांचे स्लीपर सेल आहे. स्लीपर सेलच्या माध्यमातून युवकांना खलिस्तानी अजेंड्यासाठी तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे. 


नवी मुंबईतील युवकावर लक्ष


नवी मुंबईत राहणारा एक युवक सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आला आहे. हा युवक शीख धर्मीय नसूनही शीख धर्माच्या प्रचार, प्रसाराच्या कामात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याशिवाय, दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनात नवी मुंबईतील काही नागरिकांना घेऊन हा युवक आंदोलनात सहभागी झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


हरियाणाच्या कर्नालमधून 4 दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर, महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस दहशतवाद्यांच्या पूर्वीच्या आरडीएक्सच्या खेपेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हरियाणामध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरू आहे. दहशतवाद्यांचे नांदेड कनेक्शन समोर आल्याने राज्यातील सुरक्षा यंत्रणांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. 


हरविंदर सिंह रिंदा कोण आहे?


दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा हा पंजाबमधील तरनतारण येथील आहे. महाराष्ट्रातील नांदेडमध्ये तो स्थायिक झाला होता. सध्या तो पाकिस्तानमध्ये लपला असून आयएसआयच्या मदतीने भारतात खलिस्तानी चळवळीला बळ देण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. वर्ष 2014 मध्ये पटियाला सेंट्रल जेलमधील अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याशिवाय, एप्रिल 2016 मध्ये चंदिगडमध्ये एका विद्यार्थी नेत्यावर त्याने गोळीबार केला होता.