मुंबई : 2019 च्या निवडणुकांआधी राज्यातल्या राजकीय घडीमोडींचा वेग वाढला आहे. भाजप विरोधातील महाआघाडीमध्ये सामील व्हायचे असल्यास भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना एमआयएमला बाजूल ठेवावे लागेल, असे स्पष्ट संकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिले आहेत. यासंदर्भात दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली आहे.


प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर समविचारी पक्षांच्या महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांनी येण्यासंदर्भात त्यांच्याशी बोलणी करण्यात येत आहे मात्र त्यासाठी त्यांना एमआयएमची साथ सोडण्याची अट घालण्यात आली आहे.


लोकसभा निवडणुक आता काही महिन्यांवर आल्याने महाआघाडीबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील जागावाटपासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये थांबलेली बोलणी पुन्हा सुरु झाली आहे. महाआघाडीत येण्याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी देखील लवकरात लवकर भूमिका स्पष्ट करावी असा काँग्रेस-राष्ट्रवादीचा आग्रह आहे.


प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत सोबत घेण्यासाठी राजू शेट्टी यांनी देखील प्रयत्न केले होते. प्रकाश आंबेडकरही काँग्रेससोबत जाण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली होती.


एमआयएमला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही 


काँग्रेस-राष्ट्रवादीचे राज्यातील 48 जागांचे वाटप झाले असून  महाआघाडीमध्ये येण्यासाठी आमच्याशी बोलणी करणे हा केवळ फार्स सुरु आहे, अशी प्रतिक्रीया प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तसेच आम्ही एमआयएमला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असेही ते म्हणाले.