केडीएमटी कंडक्टरवर पैशांच्या अफरातफरीचा आरोप, पँटच्या चोरखिशात अतिरिक्त 800 रुपये सापडले
एबीपी माझा वेब टीम | 22 Feb 2019 12:13 PM (IST)
परिवहन सेवेच्या बसेस नेहमी तुडुंब भरुन जात असताना उत्पन्न मात्र कमी कमी होत चाललं होतं. याविरोधात केडीएमटीचे महाव्यवस्थापक मारुती खोडके यांनी एका विशेष भरारी पथकाची स्थापना केली होती.
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेचा कंडक्टर प्रवाशांच्या तिकीटाच्या पैशांवर डल्ला मारत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष पथकाने अचानक केलेल्या तपासणीत ही बाब समोर आली आहे. परिवहन सेवेच्या बसेस नेहमी तुडुंब भरुन जात असताना उत्पन्न मात्र कमी कमी होत चाललं होतं. याविरोधात केडीएमटीचे महाव्यवस्थापक मारुती खोडके यांनी एका विशेष भरारी पथकाची स्थापना केली होती. या पथकाने 19 फेब्रुवारी रोजी कल्याण-पनवेल बसवर अचानक धाड टाकली आणि कंडक्टरची तपासणी केली. यावेळी विकल्या गेलेल्या तिकिटांच्या तुलनेत त्याच्याकडे 817 रुपये जास्त आढळले. विशेष म्हणजे हे पैसे लपवण्यासाठी त्याने पँटच्या चेनच्या शेजारी एक छोटा चोरकप्पा तयार केला होता. त्यामुळे भरारी पथकाने त्याला अक्षरशः कपडे काढून बसवलं आणि त्याची तपासणी केली. या प्रकारानंतर केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांमुळेच केडीएमटी सेवा तोट्यात चालली असल्याचं समोर आलं असून, यानंतर कल्याण डोंबिवलीकर संताप व्यक्त करत आहेत. या प्रकारानंतर कंडक्टरला निलंबित करण्यात आलं असून ही तपासणी यापुढेही सुरु राहणार असल्याची माहिती परिवहन समिती सदस्य मनोज चौधरी यांनी दिली आहे.